Nanded Heavy Rain: नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासून जोरदार पाऊस (Nanded Heavy Rain) सुरु झाला आहे. मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक  गावात हाहाकार उडाला. भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झालीय. मुखेडमधील तीन गावात शंभरहून अधीक लोकं अडकल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर पावसामुळे नांदेडमध्ये चार ते पाच जण दगावल्याची माहिती समोर येत आहे. तसेच लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे.  

नांदेड जिल्ह्यातील पूरस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. लेंडी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने पुनर्वसित रावनगाव, भासवाडी, भिंगेली आणि हासनाळ या गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. रावनगाव येथे सुमारे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून, त्यांचा शोध घेण्याचे व बचावकार्य सुरू आहे. NDRF पथकाकडून बचाव मोहिमेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पावसामुळे नांदेडमध्ये 4-5 जण दगावल्याची भीती

दरम्यान, गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, जुन्या नांदेड शहरातील पुलाला पाणी टेकले आहे. पाण्याची सतत आवक सुरू असल्याने पुराचा धोका अधिक वाढत आहे. विष्णुपुरी धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले असून, 64 हजार 412 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. येत्या तासाभरात अजून दोन दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  पावसामुळे नांदेडमध्ये चार ते पाच जण दगावल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, अनेकांना पुरामुळे स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे. खास करून नांदेड आणि लातूर या ठिकाणी अनेक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. एसडीआरएफची दोन पथक नांदेडमध्ये बचाव कार्य करत आहेत .तर लातूरमध्ये स्थानिक पथक बचाव कार्य करत आहे. काल झालेल्या पावसामध्ये हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झालंय .जवळपास सव्वाशे जनावर दगावली आहेत.

लातूर जिल्ह्याला पावसाने झोडपलं 

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील बोरगाव गावाला रात्रीतून झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली. गावात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. पावसाच्या पाण्यात ७० शेळ्या, सात बैल, पाच म्हशी, दोन ट्रॅक्टर आणि एक पिकअप वाहन वाहून गेले. त्याचबरोबर हजारो एकर शेती जमीन खरवडून गेली आहे, शेतातील उभं पीक पूर्णपणे नष्ट झालं आहे.

बीडमध्ये बलेनो कार वाहून गेली

बीडच्या परळी तालुक्यातील कौडगांव हुडा शिवारातील तेलेसमुख रोडवर असलेल्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने अंदाज न आल्याने बलेनो कार वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये एकूण चार 04 व्यक्ती होते. मध्यरात्री स्थानिक प्रशासनाने 1 ते 4 वाजेदरम्यान शोध घेतला असता 03 व्यक्तींना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. पुणे येथून एनडीआरएफ टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.

आणखी वाचा 

Mumbai Rains: मुंबई आणि ठाण्याला हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे