नांदेड : नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. आता नांदेड जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून दुचाकी चोरी (Bike Theft in Nanded) करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला होता. ही टोळी दिवसभरात गर्दीच्या ठिकाणी पार्किंग केलेल्या दुचाकी क्षणात चोरी करत होती. दरम्यान वजिराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मागच्या दोन दिवसांपूर्वी चोरीला गेलेल्या तीस दुचाकी जप्त करत 21 लाख 80 हजाराचा मुद्देमालासह तीन आरोपींना अटक केली आहे.
वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी नांदेड शहरात चालू वर्षात ज्या ठिकाणी दुचाकी चोरीचे गुन्हे घडले आहेत. त्या ठिकाणी जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज चेक करुन गुन्हेगाराचे नाव निष्पन्न करुन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिल्या.या सूचनेवरून वजिराबाद पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार दत्तराम जाधव, गजानन किडे, विजयकुमार नंदे, शरदचंद्र चावरे, संतोष बेलुरोड, व्यंकट गंगलवार, रमेश सुर्यवंशी, अंकुश पवार हे दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सर्व ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करुन आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत होते.
वजिराबाद गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी दुचाकी चोरीच्या प्रत्येक घटनेच्या ठिकाणी भेटी देऊन माहिती काढली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दुचाकी चोरटे हे परभणी येथील असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी परभणी येथे जाऊन गुन्हेगारांचा शोध घेतला असता पोलिसांनी शेख अरबाज ऊर्फ कोबरा शेख चाँद, (वय 24,रा. दर्गारोड, पारवागेट परभणी), आरेज खान उर्फ आमेर अयुब खान (वय 28, रा. मोठा मारोती देशमुख गल्ली परभणी) व मोहम्मद मुक्तदीर उर्फ मुक्का मोहम्मद अथर (वय 31 शाहीमज्जीद, स्टेडीएम रोड परभणी) यांना अटक करण्याच आली आहे. त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यावरुन तिन्ही आरोपींना वेगवेगळ्या ठीकाणाहून चोरी केलेल्या एकूण तीस दुचाकी ज्याची किंमती 21 लाख 80 हजार रुपये आहे, त्या जप्त करण्यात आल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना लक्षात घेता पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना मासिक गुन्हे बैठकीच्या वेळी सूचना देऊन दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याचे आदेश दिले होते.