Laxman Hake : माझ्यावर झालेला हल्ला हा मनोज जरांगे, शरद पवार आणि संभाजी भोसलेंच्या कार्यकर्त्यांकडून; लक्ष्मण हाकेंचा आरोप
Laxman Hake Car Attack : नांदेड जिल्ह्यातील कंधारमध्ये लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला मनोज जरांगे यांच्या कार्यकर्त्यांकडून झाल्याचा आरोप हाके यांनी केला.
नांदेड : आपल्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता, मनोज जरांगे, शरद पवार आणि संभाजी भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला. विचारांची लढाई ही विचारांनी लढा, महाराष्ट्र कुणाची जहागिरी नाही असंही लक्ष्मण हाके म्हणाले.
मराठा आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यानंतर त्याचा निषेध करत प्रा. लक्ष्मम हाके यांनी कंदार पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये नवनाथ वाघमारे यांच्यासह ओबीसी समाजातील अनेक लोक उपस्थित होते.
त्यावेळी माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, "आमच्या बापजाद्यांनी तुमचे झेंडे उचलले असतील. इथून पुढे आता तुमचे झेंडे आमची लेकरं उचलणार नाहीत. महाराष्ट्र हा कुणाच्या बापाची जहागीर नाही, कुणाची मक्तेदारी नाही. तुम्ही आजपर्यंत आमच्या मतांवर आमदार-खासदार झाला, मंत्री झाला. आमच्या उरावर तुम्ही नाचता, आम्हालाच तुम्ही प्रचार करू देत नाही हे या महाराष्ट्रात अजिबात चालणार नाही. कालचा हल्ला हा पूर्वनियोजित होता. पुण्यात झालेला हल्ला हा शरद पवार, मनोज जरांगे, मिस्टर संभाजी भोसले यांच्या कार्यकर्त्याकडून करण्यात आला."
लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, अरे विचाराची लढाई विचाराने लढा. निवडणुकीला सामोरे जा. पण तुम्ही दहशतवाद निर्माण करताय. आमची मत मागायला तुम्ही आता आमच्या दारात,वाड्यांवर, रस्त्यावर या. आमच्या तरुणांना आता कळायला लागलंय. आमची पोरं आता आमदार-खासदार होतील. त्याची सुरुवातही झाली असून लोहा कंधारचा हजारोंचा जनसमुदाय आज रस्त्यावर उतरला आहे.
लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला
लोहा मतदारसंघातील जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन पाटील यांच्या प्रचारासाठी गुरूवारी लक्ष्मण हाके आले होते. प्रचारसभा संपवून परत जाताना बाचोटी येथे हा प्रकार घडला. शंभर ते दीडशे तरुणांचा जमाव होता, पहिल्यांदा गाडीच्या बोनेटवर चढले आणि त्यानंतर गाडीच्या मागच्या बाजूच्या काचा फोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली.
हल्ला करणाऱ्यांच्या हातामध्ये काळे झेंडे होते. हल्लेखोरांनी एक मराठा लाख मराठा आणि मनोज जरांगेंच्या नावाच्या घोषणा दिल्या, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं. हाके यांची गाडी अडवून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी आंदोलक देखील आक्रमक झाले. त्यांनी देखील घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. ओबीसी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या करून घोषणा दिल्या. नंतर पोलिसांनी मध्यस्थी करून वाद शमवला अशी माहिती आहे.
ही बातमी वाचा: