नांदेड : शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीमधील कुठल्याच उमेदवाराला मतदान करू नका असा ठराव ओबीसी समन्वय समितीने केला आहे. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. नांदेडमध्ये ओबीसी समन्वय समितीच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाची मागणी योग्य आहे, पण इतरही समाजाचा विचार करावा असं वक्तव्य शरद पवार यांनी काही दिवसापूर्वी केलं होतं. त्याला आता नांदेडमध्ये ओबीसी समन्वय समितीने आक्षेप घेतला आहे.
महाविकास आघाडीला मतदान करू नका
ओबीसी, एससी, एसटी समन्वय समितीने शुक्रवारी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. शरद पवार यांनी केलेले या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. शरद पवार यांच्या या वक्तव्याने 60 टक्के ओबीसी लेकरांच्या नरड्यावर पाय दिल्याची प्रतिक्रिया ओबीसी समितीचे नेते अविनाश भोसीकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवारांना तसेच महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनासुद्धा मतदान करू नका असं आवाहन यावेळी ओबीसी समन्वय समितीने केलं. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी आपली भूमिका आधी जाहीर करावी की ते शरद पवार यांच्या स्टेटमेंटच्या बाजूने आहे की नाही अशी मागणी यावेळी करण्यात आली.