नागपूर: नरेंद्र मोदी (Narendra Modi) पहिला म्हणतात की ते ओबीसी आहेत, नंतर त्यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणतात की ते भारतात एकच जात आहे आणि ती म्हणजे गरीबी. असं असेल तर नरेंद्र मोदी मग ओबीसी कसे? असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. आम्ही दिल्लीत सत्तेत आलो तर देशात जातीय जनगणना करणार असं आश्वासनही राहुल गांधी यांनी दिलं. नागपुरात काँग्रेसचा 139 व्या स्थापना दिनाचा कार्यक्रम (Congress Foundation Day Nagpur) आयोजित करण्यात आला आहे, त्यामध्ये बोलताना राहुल गांधींनी भाजपवर टीका केली. 


राहुल गांधी म्हणाले की, "नरेंद्र मोदी हे स्वतःला ओबीसी असल्याचं म्हणाले होते. त्यांचं सरकार हे ओबीसी असल्याचं ते म्हणाले होते. मग त्यांना आम्ही विचारलं की, त्यांच्या सरकारमध्ये किती ओबीसी लोक आहेत? त्यांच्या सरकारमध्ये किती अधिकारी हे ओबीसी अधिकारी आहेत? त्यानंतर ते म्हणाले की देशात फक्त एकच जात आहे आणि ती म्हणजे गरीबी. मग असे असेल तर तुम्ही स्वतःला ओबीसी कसे काय म्हणता?"


तुमच्या सरकारमध्ये ओबीसी किती? 


नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, "देश फक्त 90 लोक चालवतात. त्यामध्ये आयएएस अधिकारी आहेत, ते संपूर्ण बजेटचे नियोजन करतात. मी त्यावर विचारलं की, या 90 लोकांमध्ये किती अधिकारी हे ओबीसी आणि दलित आहेत. त्यामधील फक्त 3 अधिकारी हे ओबीसी असल्याचं समोर आलं आहे. मग हे कसलं ओबीसींचे सरकार? भारतातील सर्वात मोठ्या कंपन्या असतील, त्यामध्ये किती ओबीसी समाज आणि दलित आहेत हे सरकारने स्पष्ट करावं."


स्वातंत्र्यापूर्वी भारतात ब्रिटिशांचे राज्य आणि राजेशाही होतं, त्यावेळी राजा म्हणेल ते खरं अशी स्थिती होती, आताही तीच परिस्थिती आहे. कुणाचंच ऐकून घ्यायचं नाही हा नरेंद्र मोदी यांचा स्वभाव आहे अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. पूर्वी दलितांना स्पर्श केला जायचा नाही, ही आरएसएसची विचारधारा आहे, आता देश त्याच मार्गावरून नेला जात असल्याचंही ते म्हणाले. 


भाजपमध्ये फक्त आदेशाचं पालन करावं लागतं


राहुल गांधी म्हणाले की, मागे मला एक भाजपचा खासदार भेटला. तो म्हणाले की राहुलजी, मी भाजपमध्ये असलो तरी मला सहन होत नाही, माझं मन काँग्रेसमध्ये आहे. मी म्हणालो की शरीर भाजपमध्ये आहे आणि मन काँग्रेसमध्ये, तर मग काँग्रेसमध्ये यायला मन का नाही होत? त्यावर तो म्हणाला की, भापजपमध्ये गुलामी आहे. वरून आदेश आला की ते करावं लागतं. वरून जो काही आदेश येईल, तो जरी मनाविरुद्धचा असला तरी त्याचं पालन करावं लागतं. 


भाजपची कार्यपद्धत ही वरून आदेशाचं पालन करणारी आहे. त्याच्या विरुद्ध अशी काँग्रेसची पद्धत आहे. आमच्या पक्षात साधा कार्यकर्ताही नेत्यांना विरोध करू शकतो. अनेक कार्यकर्ते मला म्हणतात की ही गोष्ट आम्हाला मान्य नाही. त्यावर मी त्यांचं ऐकून घेतो. काँग्रेसमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही सुरू आहे. 


काँग्रेसने काय केलं? 


स्वातंत्र्यापूर्वी या देशात पाचशे-सहाशे राजे, इंग्रज होते. त्यावेळी सामान्य जनता भरडली जात होती. त्यावेळी त्यांच्या हातात सर्व अधिकार ऐकवटले होते. राजाला जे काही हवं, जे त्याच्या मनात यायचं ते तो करायचा. त्यावेळी आरएसएसने कधीही भारतीय राष्ट्रध्वजाचा मान ठेवला नाही. त्यावेळी काँग्रेसचे कितीतरी नेते तुरुंगात गेले. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने सर्वांना समान मानलं आणि प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला. सर्वसामान्य असो वा दलित, आदिवासी असो, किंवा राजा असो, सर्वांनाच काँग्रेसने एका मताचा अधिकार दिला आणि सर्वांना समान पातळीवर आणलं. 


काँग्रेसची लढाई फक्त त्यावेळी ब्रिटिशांशी नव्हती, तर त्या वेळच्या राजा-महाराजांशी होती. त्यावेळी दलितांना स्पर्शही केला जात नव्हता, ही आरएसएसचा विचारधारा होती. आम्ही ते सगळं बंद केलं. आता पुन्हा देशाला त्या मार्गाने नेलं जात आहे.


नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेल्या अग्नीवीर योजनेवर राहुल गांधी यांनी टीका केली. या योजनेच्या माध्यमातून भाजपने तरूणांची चेष्ठा चालवली असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. 


ही बातमी वाचा: