Nagpur Railway News : केंद्रीय अर्थसंकल्पासोबतच रेल्वेकडून केल्या गेलेल्या विविध तरतुदी देखील समोर आल्या आहेत. यामध्ये पायाभूत विकासावर रेल्वेने भर दिला असल्याचे तरतुदींवरून दिसून येत आहे. विदर्भाला देखील यामध्ये बऱ्यापैकी निधी मिळालाय. नागपूर, अजनी स्थानकांच्या पुनर्विकासासह अमृत भारत योजनेंतर्गत रेल्वेस्थानकांचा विकास केला जाणार आहे. यासह विदर्भातील विविध रेल्वे प्रकल्पांसाठी मोठ्याप्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य पूर्व रेल्वेच्या नागपूर विभागातील (Nagpur) व्यवस्थापकांनी प्रकल्प व त्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती दिली. 

Continues below advertisement


15 स्थानकांचा विकास ; सल्लागार नियुक्तीसाठी निविदा निघाल्या


अमृत भारत योजनेंतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत अससलेल्या 15 रेल्वेस्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. विशेष म्हणजे अगदी तातडीने रविवारीच सल्लागार नियुक्तीसाठी निविदा मागविल्या जाणार आहेत.  विभागीय व्यवस्थापक मनिंदरसिंह उप्पल यांनी सांगितले की, झोनमधील विविध प्रकल्पांसाठी 790 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील मोठा निधी नागपूर विभागालाही मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इतवारी स्टेशनमध्ये दुसऱ्या पिट लाईनसाठी  22.78 कोटी, इतवारी ते दुर्ग दरम्यान कलमना स्थानक परिसरात टेस्टिंग पॉईंट तैयार कर्यासाठी 75.92 कोटी, गोंदियात मेमू-डेमू यार्डमध्ये 12 डब्यांएवजी 16 डब्यांची व्यवस्था करण्यासाठी 37.59 कोटी, आरयूबी आणि आरओबीसाठी 334 कोटी, नव्या रेल्वे मार्गासाठी  389 कोटींची मागणी करण्यात आली आहे. 


झोनचा पहिला एलिवेटेड रेलवे ट्रॅक


इतवारी-नागभीड ब्राडगेज प्रकल्पांतर्गत उमरेड ते नागभीड दरम्यान येणाऱ्या वन क्षेत्रातून 16 किमी लांब एलिवेटेड अर्थात वरून जाणारा रेल्वे ट्रॅक तयार केला जाणार आहे. हा झोन मधील पहिला एलिवेटेड रेल्वे ट्रॅक ठरेल. वनविभागाकडून या कामाची परवानगी मिळाली आहे. लवकरच केंद्रीय वन विभागाकडूनही मंजुरी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


या मार्गांसाठी निधी 



  • राजनांदगांव-नागपूर थर्ड लाइन : 777.42 कोटी

  • वडसा-गडचिरोली नवी लाइन : 152 कोटी

  • छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेज : 15 कोटी


सीआर विभागासाठी 3 हजार कोटींहून अधिकचा निधी 


रेल्वेने देशातील महत्त्वांच्या रेल्वेस्थानकाचा चेहरा मोहरा पालटण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधीही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नागपूर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 589 कोटी, अजनी स्टेशनला 359 कोटीतून विकासकामे सुरू करण्यात आली आहे. अमृत भारत योजनेंतर्गत गोधनी स्थानकाचा विकास केला जाणार आहे. 


थर्ड फोर्थ लाइनसाठी 1,760 कोटी


महाराष्ट्रात रेल्वे विकासासाठी विक्रमी 13,539 कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्यातील सुमारे 3,000 कोटींचा निधी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला मिळणार आहे. महत्त्वाकांक्षी थर्ड व फोर्थ लाइनसाठी सर्वाधिक 1,760 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मध्य रेल्वे अंतर्गत असलेल्या एकूण 123 स्थानकांची अमृत भारत योजनेत समावेश करण्यात आला असून त्यातील 32 स्थानके एकट्या नागपूर विभागातील आहेत. गोधनीसह, बल्लारशा, बैतूल, चंद्रपूर, सेवाग्राम, पुलगाव, धामनगाव, आमला, नरखेड, पांढूर्णा, जुन्नारदेव, हिंगणघाट, मुलताई, घोडाडोंगरी, परासिया, बोरदेही, नवेगाव, वरोरा, चांदूर, हिरदागढ, वरुड, कळमेश्वर, मोर्शी, भांदक, माजरी, बुटीबोरी, वणी, खापरी, बोरखेडी आदी स्थानकांचा समावेश आहे. 


या मार्गासाठी निधी



  • वर्धा-यवतमाळ- नांदेड नवी लाईन : 850 कोटी

  • वर्धा-सेवाग्राम थर्ड लाईन : 150 कोटी

  • वर्धा-नागपूर फोर्थ लाईन : 150 कोटी

  • बल्लारशाह-वर्धा थर्ड लाईन : 300 कोटी

  • इटारसी-नागपूर थर्ड लाईन : 310 कोटी


ही बातमी देखील वाचा...


Nagpur Metro : नागपूर मेट्रोच्या भाडेवाढीवरुन संताप; विद्यार्थ्यांनी पुन्हा धरली 'आपली बस'ची वाट