नागपूर : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्स येथे द्वितीय दीक्षांत समारंभ सोहळा संपन्न झाला. यावेळी, नव्याने वैद्यकीय पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांना राष्ट्रपतींनी मोलाचा सल्ला दिला. डॉक्टरांसाठी करुणा, प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्ये सर्वात महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. तरुण डॉक्टरांनी आयुष्यभर शिकत राहण्याची आणि संशोधनाची वृत्ती जोपासावी. कारण, जिज्ञासा हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे. वैद्यकीय क्षेत्र मानवतेची सेवा असून त्यास केवळ व्यवसाय मानू नये, रुग्णांसोबतच्या सहानुभूतीपूर्ण संवादामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळतो, असेही राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सर्वच डॉक्टरांना उद्देशून म्हटले.
नागपूरच्या AIIMS ने वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि उत्कृष्ट आरोग्यसेवा क्षेत्रात एक अग्रगण्य केंद्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी ते कधीही करुणा, प्रामाणिकपणा आणि रुग्णकेंद्री दृष्टिकोनाची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे, डॉक्टरांसाठी करुणा, प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्ये सर्वात महत्त्वाची असल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटले. तसेच, एम्समधील पदवीधर विद्यार्थ्यांनी नेहमीच करुणेची भावना जोपासावी, असे आवाहन देखील त्यांनी केले. देशात असलेली ग्रामीण-शहरी आरोग्य तफावत आज कमी करण्यासाठी AI, डिजिटल हेल्थ आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर आपण वाढवला पाहिजे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक नागरिकाला 5 किमीच्या आत परिपूर्ण आरोग्य सेवा
राज्यातील प्रत्येक नागरिकाला तो राहत असलेल्या पाच किलोमीटरच्या आत परिपूर्ण आरोग्यसेवा मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील समारंभात बोलताना म्हटले. सध्या नॉन-कम्युनिकेबल आजार हे आरोग्य क्षेत्रात नवीन आव्हान असून त्यासाठी महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र रणनीती तयार केली जात आहे. राज्यात प्रत्येक नागरिकाला तो राहत असलेल्या 5 किमी परिसरातच परिपूर्ण आरोग्य सेवा मिळेल, असे फ्रेमवर्क विकसित केले जात आहे. राज्यात प्रायमरी हेल्थ केअर मजबूत करताना टर्शरी केअरपर्यंतही नागरिकांना सहज प्रवेश मिळेल, असेही आमचे प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या नेतृत्वात देशात वैद्यकीय शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून महाराष्ट्रातही गेल्या काही वर्षांत 15 पेक्षा जास्त मेडिकल कॉलेज सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा आणि डॉक्टर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
हेही वाचा
आदित्य ठाकरेंना शिवसेनेचं कार्याध्यक्षपद? चर्चांना पूर्णविराम देत आदित्य ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
