नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने 15 ऑगस्टपर्यंत राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेला नागपुरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. अवघ्या 15 दिवसांत एक लाखावर लसीकरणाचे डोस शहरात देण्यात आलेले आहेत. शहरात वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागपूर शहरात लसीकरण मोहिमेला गती दिली. 


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात शहरात लसीकरण केंद्रांचीही संख्या वाढविण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 18 वर्षावरील सर्वांच्या कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोसच्या नि:शुल्क लसीकरणामध्ये 'हर घर दस्तक' मोहिम सुद्धा राबविण्यात आली. पात्र सर्व व्यक्तींना घरी जाउन बुस्टर डोस देण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुढील 75 दिवस चालणाऱ्या लसीकरण मोहिमेच्या सुरूवातीच्या 15 दिवसातच नागरिकांनी उत्तम प्रतिसादर दर्शविला आहे. मात्र कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी अद्यापही लसीकरणापासून वंचित असलेल्यांनी लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.
 
लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक लसीकरण


15 ते 31 जुलै या कालावधीमध्ये पहिला, दुसरा आणि बुस्टर असे एकूण 1,21,579 लसीकरणाचे डोस देण्यात आलेले आहेत. लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक 18181 बुस्टर डोस घेण्यात आले. तर पहिला डोस घेणा-यांची संख्या धरमपेठमध्ये जास्त आहे. धरमपेठ झोनअंतर्गत 1187 नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये लकडगंज झोनमधील नागरिक अग्रक्रमावर आहेत. लकडगंज झोन अंतर्गत 2047 नागरिकांनी दुसरा डोस घेतला. शहरातील दहाही झोनमध्ये 5853 नागरिकांनी पहिला डोस घेतला तर 12833 एवढे दुसरा डोस आणि 102893 एवढे बुस्टर डोस देण्यात आले आहेत. 


निशुल्कः बुस्टर डोस घ्या


शहरातील मनपाच्या आणि शासकीय केंद्रांवर नि:शुल्क लसीकरणाची सोय उपलब्ध असून दोन्ही डोस घेउन 6 महिन्याचा कालावधी झालेल्या 18 वर्षावरील प्रत्येकाने लगेच आपले बुस्टर डोसचे लसीकरण करून घ्यावे. याशिवाय अद्यापही ज्यांनी पहिला किंवा दुसरा डोस घेतलेला नसेल त्यांनी लसीकरण करून स्वत:सह इतरांच्या सुरक्षेबाबत आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे.


Nagpur : नागपुरात ड्रग्स विरोधात लढणार 'पोलीस काका'; तरुणाईमध्ये अमली पदार्थाचा वापर रोखण्याकरता पोलिसांचा अभिनव उपक्रम