नागपूर : विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मध्यामातून जाहिरात केल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेमने (Online Gaming) तरुणांभोवती विळखा घातला आहे. राज्यातील अनेक तरुण ऑनलाईन गेमिंगच्या नादात व्यसनाधीन झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेकांनी कोट्यवधी रुपये देखील गमावले आहे. ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जाऊन झटपट पैसे कमावण्याच्या जाहिरातीमुळे अनेक तरुण याकडे आकर्षित होत असतात. त्यातून अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान देखील होत असते. या गेमिंगच्या नादात राज्यात आतापर्यंत एकाची हत्या झाली आहे. तर पैसे हरल्याच्या तणावात आलेल्या सात जणांनी आत्महत्येचे (Online Gaming Suicides) पाऊल उचलले आहे. ही माहिती राज्य शासनानेच विधानपरिषदेत दिली आहे. या गंभीर मुद्द्यावर मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी ऑनलाईन गेमसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्या लेखी उत्तरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ही माहिती दिली.
राज्यभरात ऑनलाईन गेमिंगचे 41 गुन्हे
राज्यातील तरुण पिढीला ऑनलाईन गेमसंदर्भात आकर्षित करण्यासाठी अनेक जाहिरातींची भुरळ घातली जाते. ज्यामध्ये अनेक सिनेअभिनेत्री, अभिनेत्यांचा समावेश असतो. आजघडीला या ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून अनेक तरुणांना अक्षरशः त्याचे व्यसन लागले आहे. यात सतत पैसे हरल्याने चंद्रपूरमध्ये एकाची हत्या झाली, तर त्याच जिल्ह्यात एकाने आत्महत्या केली आहे . याशिवाय ठाण्यात दोन, रायगडमध्ये एक, नाशिक ग्रामीणमध्ये दोन व गोंदियात एक आत्महत्याच्या घाटनांची नोंद करण्यात आली आहे. विशेषबाब म्हणजे 2021 ते 2023 या कालावधीत राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत ऑनलाईन गेमिंग बाबत 41 गुन्हे नोंदविण्यात आले. यातील सर्वाधिक 19 गुन्हे नाशिक शहर, 15 गुन्हे नाशिक ग्रामीण, ठाण्यात 5 तर जळगाव, नवीन मुंबईत प्रत्येकी एक-एक गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ऑनलाईन गेमसह जाहिरातींवर घालावी बंदी- मनिषा कायंदे
विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी ऑनलाईन गेमसंदर्भात विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्या लेखी उत्तरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. राज्यातील तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी अनेक जाहिरातींची भुरळ घातली जाते. ज्यामध्ये रमी सर्कल, जंगली रमी, तीन पत्ती, ए. 23 सारख्या जाहिरातीमधून जुगार खेळण्यासाठीचे आवाहन केले जाते. अश्या जाहिरातींवर बंदी आणण्याची मनिषा कायंदे यांनी केली. तसेच त्याचा प्रसार-प्रचार करणा-या अभिनेत्री अभिनेता व चॅनेलवर कारवाई करण्याची मागणी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. अशी माहिती मनिषा कायंदे यांनी दिली.