Continues below advertisement

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA), एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि हाउसिंग अ‍ॅण्ड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (HUDCO) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्रातील भावी आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्तीय केंद्र (IBFC) म्हणून 'नवीन नागपूर' या भव्य प्रकल्पाला गती मिळाली आहे. या करारांमुळे नवीन नागपूरच्या जागतिक दर्जाच्या विकासाला चालना मिळणार आहे.

हडकोसोबत करार – ₹11,300 कोटींचा वित्तपुरवठा

एनएमआरडीए आणि हडको यांच्यातील कराराअंतर्गत हुडको ₹11,300 कोटी इतका निधी उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये ₹6500 कोटी नवीन नागपूरचे भूसंपादन तसेच व्यावसायिक विकास आणि पायाभूत सुविधा विकास व ₹4800 कोटी नागपूर बाह्य वळण रस्त्यासाठीच्या भूसंपादनासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. या निधीमुळे 'नवीन नागपूर' प्रकल्पाची संकल्पना आणि 'नागपूर बाह्य वळण रस्ता' यांसारखे पायाभूत प्रकल्प वेगाने आकार घेतील.

Continues below advertisement

एनबीसीसीसोबत करार – 1000 एकरांवर नवे आंतरराष्ट्रीय वित्तीयसेवा केंद्र

एनएमआरडीए आणि एनबीसीसी (इंडिया) लि. यांच्यात झालेल्या करारानुसार नवीन नागपूर प्रकल्पातील 1710 एकरांपैकी 1000 एकरांवर विकासाचे काम हाती घेतले जाणार आहे. उर्वरित 710 एकर भावी विस्तारासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. हा विकास 'प्लग-अँड-प्ले' मॉडेलवर आधारित असेल. यात समाविष्ट होणाऱ्या सुविधांमध्ये भूमिगत उपयुक्तता टनेल्स, डिस्ट्रिक्ट कूलिंग सिस्टम, स्वयंचलित कचरा संकलन व वर्गीकरण प्रकल्प, स्टार्ट-अप्स, एमएसएमई, आयटी कंपन्या, व्यावसायिक केंद्रे, तसेच निवासी व मिश्र वापर प्रकल्प यांचा समावेश आहे.

एनबीसीसीला या प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन व सल्लागार संस्था म्हणून नेमण्यात आले आहे. पुढील 15 वर्षांत 3 टप्प्यांत हा प्रकल्प राबवला जाणार आहे. यासाठी एक सक्षम समिती स्थापन करण्यात येईल, या समितीचे अध्यक्ष एनएमआरडीएचे आयुक्त असतील.

या प्रकल्पांना राज्य मंत्रिमंडळाने 3 सप्टेंबर 2025 रोजी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष अंमलबजावणीस गती मिळणार आहे. या दोन्ही सामंजस्य करारांमुळे 'नवीन नागपूर' हा देशातील एक अत्याधुनिक आणि जागतिक पातळीवरील वित्तीय व व्यवसायिक केंद्र बनण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले गेले आहे. नागपूरच्या आर्थिक नकाशावर हा प्रकल्प 'गेम चेंजर' ठरणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीष महाजन व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ही बातमी वाचा: