Nagpur : खात्यांतर्गत छळामुळे पत्नीचा जीव गेला, पतीचा आरोप, पोस्ट कार्यालयातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याकडे बोट
Nagpur Post Officer Death: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यक्रमात दोन महिला अधिकाऱ्यांचा जागेवरुन वाद झाला होता. त्यातील एका अधिकाऱ्याच्या छळामुळे आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा दावा पतीने केला.

नागपूर : टपाल खात्यात वरिष्ठ संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या महिला अधिकाऱ्याचा मे महिन्यात नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. टपाल खात्यात पोस्ट मास्टर जनरल अधिकारी असलेल्या महिला अधिकाऱ्याच्या छळामुळे आटो इम्युनिटी डिसऑर्डर झाला आणि त्यात तिचा मृत्यू झाला असल्याचा खळबळजनक आरोप मृत पावलेल्या महिला अधिकाऱ्याच्या पतीने केला. पत्नीच्या मृत्यूपासून आपण टपाल खात्यातील (Post Office) अनेक अधिकारी, राज्यातील सर्व मंत्री, केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रपती यांच्यासोबत मेलवरून पत्रव्यवहार केला. पण न्याय मिळाला नसल्याचा आरोप पती पुष्पक मिठे याच्याकडून होत आहे.
मूळच्या वर्ध्याच्या असलेल्या महिला अधिकारी वसुंधरा गुल्हाने-मीठे या 2014 च्या यूपीएससी पासआऊट होत्या. त्यांची बदली नागपूर येथे झाली. तर त्यांचा छळ केल्याचा ज्या महिला अधिकाऱ्यांवर आरोप केला जात आहे त्यांचे नाव शोभा मधाळे असून त्या टपाल खात्यात पोस्ट मास्टर जनरल म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर जागेसाठी दोन महिला अधिकाऱ्याची धुसफूस समोर आली. त्यामध्ये या शोभा मधाळे दिसून येतात.
Dr Vasundhara Gulhane Mithe Death Case : सातत्याने अपमान
टपाल खात्यात उच्च अधिकारी असलेल्या वसुंधरा गुल्हाने-मिठे यांनी नागपूर येथे 2024 च्या जानेवारी महिन्यात संचालक म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून पोस्ट मास्टर जनरल यांच्याकडून वारंवार अपमान, टोचून बोलणे, मानसिक त्रास दिला जात होता. सततच्या त्रासामुळे वसुंधरा यांना आटो इम्युनिटी डिसऑर्डर आजार झाला असा आरोप केला जात आहे. 7 मे 2025 रोजी नागपूर येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. 16 मे 2025 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
Nagpur Post Officer Death : सगळीकडे तक्रार, पण न्याय नाही
पत्नीचा मृत्यू वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या मानसिक छळामुळे झाला असल्याचा आरोप पती पुष्पक मिठे यांनी केला. याबाबत केंद्रीय मंत्री तसेच राज्यातील सर्व मंत्र्यांना आपण पुराव्यानीशी ई मेल करून न्याय मागितल्याचं त्यांनी म्हटलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना देखील मेल करून न्याय मागितला. पण अद्याप मला न्याय मिळाला नसल्याचे पती पुष्पक मिठे म्हणाले. शोभा मधाळे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
Nagpur Post Office News : स्टेजवरील जागेमुळे चर्चेत
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील कार्यक्रमात दोन महिला अधिकाऱ्यांची मंचवरील धुसफूस व्हायरल झाली होती. यातील एक अधिकारी या शोभा मधाळे होत्या. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शोभा मधळे या चर्चेत आल्या. त्या नेहमीच वादात राहत असल्याचा आरोप पुष्पक मिठे यांच्याकडून करण्यात आला.
ही बातमी वाचा:
















