नागपूर : मनात जिद्द असली की कुठल्याही प्रकारचे शारीरिक व्यंग यशाच्या आड येत नाही. नागपूरच्या हरीश प्रजापती या तरुणाने नेमकं हेच सिद्ध करून दाखवले आहे. बालपणापासून 90 टक्के अंधत्व असलेल्या हरीश प्रजापतीने कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात "हम तो जीतेंगे" हे सर्वाना प्रेरणादायी पुस्तक लिहिले. लहान बालकांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना प्रेरणा देणारे हे पुस्तक आता प्रकाशित झाले आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालयात लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात आम्ही घरात बसून काय करावे अशा कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला हरीश ने एक समर्पक उत्तरही दिले आहे.      


कोरोना महामारी प्रत्येकाच्या जीवनात काही तरी अडचण घेऊन आली. काहींच्या नोकऱ्या, रोजगार गेले तर लॉकडाऊनमुळे काहींच्या धंद्याला कात्री लागली. वृद्ध आणि चिमुकले काहीही चूक नसताना घरात कोंडले गेले. जीवनातील हे सर्व बदल नैराश्य निर्माण करणारे ठरले आहे आणि अशा काळात प्रेरणा देणाऱ्या, मनात उत्साह निर्माण करणाऱ्या गोष्टींची, लिखाणाची आवश्यकता ओळखून नागपूरच्या हरीश प्रजापती नावाच्या अंध तरुणाने "हम तो जितेंगे" हे पुस्तक लिहिले आहे. खास बाब म्हणजे हिंदी भाषेत लिहिलेले हे पुस्तक हरीशने लॉकडाऊनच्या काळात पाच महिन्यांच्या कालावधीत, तो सुद्धा घरात कोंडला गेला असताना लिहिले आहे.


भीती कशी घालवायची, आत्मविश्वास कसा निर्माण करायचा, वेळेचा सदुपयोग कसा करायचा, प्रभावशाली संवाद कसे साधायचे या सारख्या अनेक विषयांवर हरीशने या लिखाण केलंय. विशेष म्हणजे स्वतः अंध असलेला हरीश सामान्य व्यक्तीसारखं पुस्तक वाचू शकत नाही. त्याला स्वतःचा ज्ञानार्जन करण्यासाठी ऑडिओ बुकचा वापर करावा लागतो.     


जुन्या नागपूरच्या दही बाजार परिसरातील लालगंज या अत्यंत दाटीवाटीच्या वस्तीत लहानशा घरातच हरीश प्रजापती लहानाचा मोठा झाला. हरीशला बालपणापासूनच दृष्टी दोष होता. कुटुंबीयांनी अनेक डॉक्टरांकडे उपचार केले पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे 90 टक्के अंधत्वसह हरीशला त्याचं शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यास पूर्ण करावा लागला. सध्या हरीश अर्थशास्त्रात एमए करत असून तो अंतिम वर्षाला आहे. 


स्वतःच्या जीवनात अंधत्वामुळे निर्माण झालेल्या नैराश्यामुळे हरीशने इतरांच्या जीवनात प्रेरणा निर्माण करण्याचे ठरविले.त्यासाठी त्याने कोरोना काळातील लॉकडाऊनच्या काळाचा वापर केला आणि आपल्या बहिणीच्या मदतीने 50 पानांचे पुस्तक लिहिले. पुस्तक लिहिताना लागणारे सर्व संदर्भ हरीशने त्याचे शिक्षक, इतर तज्ञ यांच्याशी फोनवर बोलून आणि समाज माध्यमातून गोळा केले. एकदा पुस्तकासाठीचा तपशील निश्चित झाल्यानंतर नंतर हरीश पुस्तकासाठीचा तपशील डिक्टेट करायचा आणि त्याची धाकटी बहिण स्वाती ती लिहून काढायची.


हरीशच्या आई वडिलांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. आई-वडील दोघे छोटीमोठी कामे करून मुलांचा भवितव्य चांगला व्हावा यासाठी त्यांच्या शिक्षणासाठीची व्यवस्था करत आहेत. हरीश आणि त्याची बहीण स्वाती लॉकडाऊनच्या काळात पुस्तक लिहित आहेत, याची कोणतीही माहिती सुरुवातीला आई वडिलांना नव्हती. ते माहित झाल्यानंतर पालकांनी हरीशला थांबवले नाही. उलट त्याचे पुस्तक निर्विघ्नपणे प्रकाशित व्हावा यासाठी आपले दागिनेसुद्धा गहाण ठेवले.    


दृष्टीदोषामुळे वाट्याला आलेल्या अंधत्वामुळे हरीश बालपणासून विविध आव्हानांचा सामना करतोय. भविष्यात त्याला मोटिव्हेशनल स्पीकर व्हायचे आहे. त्यासाठी तो सध्या आरश्यासमोर उभे राहून स्पीच थेरेपीवर काम करतोय. घरात शिक्षणाचे फारसे वातावरण नसतानाही तो इंग्रजीत संभाषण करतो. हे सर्व हरीशने त्याच्या प्रबळ इच्छाशक्ती व जिद्दीच्या बळावर सध्या केले आहे.


महत्वाच्या बातम्या :