Nagpur DJ Ban : इकडे DJ वरुन पुण्यात गोंधळ, तिकडे नागपुरात डॉल्बी साऊंड सिस्टिमवर बंदी, विश्वास नांगरे पाटलांचा धडाकेबाज निर्णय
Nagpur Dolby Sound System Ban: नागपुरात आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉल्बी साऊंड सिस्टीमवर 1 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Nagpur Police Order DJ Ban : आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलिसांनी ध्वनी प्रदूषणाविरोधात एक अत्यंत मोठा आणि कडक निर्णय घेतला आहे. मिरवणुकीत वापरल्या जाणाऱ्या डीजे (DJ) आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमवर नागपुरात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ही बंदी 3 सप्टेंबर मध्यरात्री 12 वाजेपासून ते 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. यामुळे आगामी सणांमध्ये डीजेच्या दणदणाटाला आळा बसणार आहे.
एकीकडे पुण्यात डीजे बंदीवरून गोंधळ सुरू असताना नागपुरात मात्र त्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरातील यंदाच्या गणेशोत्सवात डीजेच्या दणदणाटाला आळा बसणार आहे.
Nagpur Dolby Sound Ban Rules : वाहने होणार सील
अधिसूचनेत नमूद केल्यानुसार, सण-उत्सवांच्या काळात टॉप, मिड आणि बेस (Top, Mid and Bass) अशी मल्टीस्पीकर सिस्टीम, प्लाझ्मा साऊंड सिस्टीम आणि प्रेशरमिड साऊंड सिस्टीमचे एकावर एक थरावर थर चढवून वाहनांवर एखाद्या भिंतीसारखी रचना उभारली जाते. यासाठी वाहनांच्या मूळ रचनेत बेकायदेशीर बदल केले जातात.
अशा प्रकारे डीजेचा थरांवर थर लावून साऊंड सिस्टीम वापरताना मंडळाचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्ष, संघटनांचे नेते, कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन यांच्यात तणाव निर्माण होण्याची मोठी शक्यता असते. तसेच यामुळे ध्वनी मर्यादेचे (Noise Pollution Rules) तीव्र उल्लंघन होते आणि कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो.
त्यामुळे अशी मल्टी-लेयर साऊंड सिस्टीम वापरण्यासाठी आणलेली वाहने किंवा रचनेत बदल केलेली वाहने जिथे आढळतील, तिथेच ती सीलबंद (Seal) करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
Noise Limits Exception : नियमांचे पालन करणाऱ्या साऊंड सिस्टीमला सूट
नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या या कडक आदेशामुळे यंदा सण-उत्सवांच्या मिरवणुकीत डॉल्बी साऊंड सिस्टीमच्या वापरावर मोठे निर्बंध आले आहेत.
मात्र, प्रशासनाने अधिसूचनेत स्पष्ट केले आहे की, ही कडक बंदी केवळ अवाजवी आणि नियमबाह्य डॉल्बी सिस्टीमवर आहे. शासनाने आखून दिलेल्या अधिकृत ध्वनी मर्यादेचे (Decibel Limits) तंतोतंत पालन करणाऱ्या सामान्य साऊंड सिस्टीमला ही अधिसूचना लागू होणार नाही.
नागपुरात डीजे बंदीसाठी चळवळ
विधानपरिषदेचे माजी आमदार, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी नागपुरात डीजे बंदीसाठी पुढाकार घेतला आहे. विविध सण आणि उत्सवांमध्ये होणारा डीजेचे भयानक आवाज, तसंच घातक लेझर लाईटमुळे लोकांच्या कानावर आणि डोळ्यावर अत्यंत विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माचा सण उत्सव असेल तरी डीजे आणि लेझर लाईटच्या वापरावर पूर्ण बंदी घातली पाहिजे अशी मागणी संदीप जोशी यांनी केली आहे. सर्वधर्मीयांनी आनंद साजरा केला पाहिजे. मात्र परंतु तो साजरा करताना आपल्याकडे असलेले बँड, ढोल-ताशांचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
ही बातमी वाचा:
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















