Nagpur DJ BAN : महाराष्ट्राच्या उपराजधानीत डीजे बंदी झुगारली, नागपूरमध्ये डीजेच्या दणदणाटात लेझरसह दहीहंडी उत्सव सुरु
Nagpur DJ Ban : नागपूरच्या बडकस चौकात डीजे बंदीचा आदेश झुगारुन लेझरचा वापर करत दहीहंडी उत्सव सुरु करण्यात आला आहे. पोलीस आवाजाच्या मर्यादेवर लक्ष ठेवून आहेत.

Nagpur DJ Ban Violation नागपूर : पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी डीजेवर 1 नोव्हेंबरपर्यंत बंदी घातली होती. मात्र, हे आदेश धुडकावत नागपूरमध्ये डीजेचा दणदणाट सुरु असल्याचं समोर आलं आहे. दहीहंडी उत्सव नागपूरमध्ये सुरु आहे. पोलिसांच्या सूचनेनंतर ही DJ वाजवत आणि लाइट्सचा वापर करत दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदाकडून थर रचणे सुरू झाले आहे. नागपूरच्या बडकस चौकात "बडकस चौक मित्र परिवार" तर्फे आयोजित दहीहंडीला सुरुवात झाली आहे. बडकस चौकात पोलीस ही उपस्थित आहेत मात्र पोलीस आवाजाच्या मर्यादेवर लक्ष ठेवून आहेत.
आवाज कमी मात्र डीजेचा दणदणाट
नागपूरच्या बडकस चौकातील बडकस चौक मित्र परिवारानं सकाळपासून डीजे लावणार अशी भूमिका घेतली होती. संध्याकाळी दहीहंडीचा उत्सव सुरु झाला तेव्हा डीजे सुरु करण्यात आला आहे. डीजे लावण्यात आला असून आवाज नेहमीसारखा नाही. मात्र, काही अंशी कमी असला तरी डीजेचा दणदणाट सुरु आहे. तीव्र प्रकाशाच्या लाईटसचा वापर करण्यात आलेला आहे. बडकस चौकात गोविंदा पथकं थर रचून सहभाग नोंदवत आहेत. पोलीस देखील बडकस चौकात असून ते आवाज नोंदवत आहेत. सात वाजताच्या सुमारास आवाज 80 ते 82 डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे. पोलीस याबाबत काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. डीजेचा वापर करुन बंदीचा आदेश झुगारुन लावल्याचं पाहायला मिळतंय.
नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी डीजे बंदीचे आदेश दिले होते. यानंतर भाजपचे माजी आमदार संदीप जोशी डीजे बंदी केवळ दोन महिन्यांची नको ती कायमस्वरुपी असावी अशी मागणी केली होती. तर, भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी डीजे बंदी मागं घेण्याची मागणी केली आहे. हिंदूंच्या सणांच्या वेळीच डीजेवर बंदी का असा सवाल प्रवीण दटके यांनी केला आहे.
संदीप जोशींची डीजेवर बंदीची भूमिका
भाजपचे माजी आमदार संदीप जोशी यांनी डीजेवरील बंदी संदर्भातील भूमिका त्यांची वैयक्तिक असल्याचं म्हटलं. याचवेळी त्यांनी ती भूमिका लोकभावनेची, सर्वसामान्य रुग्णांची भूमिका आहे. ही सर्वसामान्य जनतेची भूमिका आहे.सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांची, सर्वसामान्य सर्वधर्मीय गर्भवती महिलांची, बच्चूंची भूमिका आहे, असं संदीप जोशी म्हणाले. मला अनेकांनी हमीपत्र देखील लिहून दिलेले आहे. जवळपास 20 ते 25 मंडळ आहे की ज्यांनी हमीपत्र लिहून दिलेल आहे की ते म्हणतात आहे की आम्ही डीजेचा वापर करणार नाही, असं संदीप जोशी म्हणाले.
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















