Bhagat Heti : 200 वर्षांपासून वस्ती, पण साधं नळाचं पाणी, रेशन अन् शाळाही नाही; गावपण मिळवण्यासाठी झगडतंय नागपुरातील 'भगत हेटी'
Bhagat Heti Nagpur : गावाचा दर्जा नसल्याने या वस्तीमध्ये साधी शौचालय योजना, नळ योजनाही राबवली जात नाही. या वस्तीत कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही.

नागपूर : राज्यातील विविध गावांना चांगल्या सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी सरकार तसेच महसूल विभाग अनेकविध योजनांची घोषणा करत उत्तम कामांचे दावे करतात. मात्र, मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात नागपूर शहरापासून 40 किलोमीटर अंतरावरील 'भगत हेटी' या मानवी वस्तीला महसूल प्रशासन आणि राज्य सरकार जणू विसरलं असल्याचं दिसतंय. सुमारे 150 ते 200 वर्षांपासून मानवी वस्ती असलेला 'भगत हेटी'ला अनेकदा मागणी करूनही गावाचा दर्जा मिळाला नाही.
'भगत हेटी'ला गावाचा दर्जा न मिळाल्याने त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. साध्या साध्या गोष्टींसाठी झगडावं लागतं. गावाचा दर्जा नसल्याने तिथल्या कोणत्याही मागणा पूर्ण होत नाही, किंबहुना प्रशासन आणि शासन त्याकडे दु्र्लक्ष करताना दिसतं.
No Village Status To Bhagat Heti : गावाचा दर्जा न मिळाल्याने काय सुविधा नाहीत?
- 'भगत हेटी' मध्ये आजवर साधी अंगणवाडी नाही.
- रेशन दुकान नाही
- शाळा नाही.
- प्राथमिक आरोग्य केंद्र नाही.
- नळ योजनाही नाही.
- तलाठी कार्यालय नाही.
वस्तीला गावाचा दर्जा नसल्यामुळे घरकुल योजना, शौचालयांची योजना, अशा कुठल्याही शासकीय योजनाचा लाभ इथे पोहोचत नाही. अनेक आंदोलनंतर, तीन महिन्यापूर्वी भगत हेटीला वीज पुरवठा देण्यात आला.
Nagpur Bhagat Heti Settlement : रस्त्याविना अनेकांचा मृत्यू
नागपूर-उमरेड महामार्गापासून भगत हेटी वस्ती कडे जाणारा चार किलोमीटरचा रस्ता पावसाळ्यात बंद होऊन जातो. परिणामी गेल्या काही वर्षात पावसाळ्यात उपचाराअभावी सर्पदंश, विंचूदंश झालेले किंवा तीव्र आजारी असलेल्या अनेकांनी उपचाराविना जीव गमावला आहे.
Bhagat Heti Settlement : भगत हेटी जिल्ह्याला दूध पाजणारी वस्ती
विशेष म्हणजे भगत हेटी ही गोपालकांची वस्ती असून या वस्तीत माणसांच्या संख्येपेक्षा गाई-म्हशींची संख्या आठपट जास्त आहे. भगत हेटी वस्ती नागपूर शहरासह जिल्ह्याच्या अनेक गावांना दूध पुरवणारी प्रमुख वस्ती आहे. ही वस्ती गावाच्या दर्जासाठी गेले अनेक दशकं संघर्ष करत आहे. मात्र, आजवर त्यांना गावाचा दर्जा न मिळाल्यामुळे कोणतीही शासकीय योजना किंवा सोयींचा लाभ या मिळत नाही.
Bhagat Heti : रहिवाशाचे अनेक भक्कम पुरावे
भगत हेटी वस्तीतील अनेक नागरिकांकडे त्यांच्या पूर्वजांचे 1930-40 आणि 50 च्या दशकातील कोतवाल पणजी शाळेतील टीसी आणि महसुली दस्तावेज उपलब्ध आहे.
Bhagat Heti Nagpur : भगत हेटीला आजवर गावाचा दर्जा का नाही?
भगत हेटीची लोकसंख्या कमी असल्याने महसूल विभाग या वस्तीला गावाचा दर्जा देण्यास तयार नाही. सामान्यपणे महसुली गावाचा दर्जा मिळवण्यासाठी किमान साडेचारशे लोकसंख्या असणे आवश्यक आहे. मात्र, भगत हेटीची लोकसंख्या कमी असल्याने त्यास गावाचा दर्जा देण्यास महसूल विभाग तयार नाही. तर दुसऱ्या बाजूला भगत हेटीच्या अवतीभवती झुडपी जंगल असल्याने वन विभागही भगत हेटीला वनग्रामचा दर्जा द्यायला तयार नाही.
असे हाल सोसणाऱ्या भगत हेटीच्या नागरिकांनी आम्ही महाराष्ट्राचे नागरिक नाही का असा सवाल विचारला आहे. महसूल विभाग आणि वन विभागाने गेल्या अनेक वर्षांपासून सुरू केलेली टोलवाटोलवी बंद करावी आणि आम्हाला गावाचा दर्जा देऊन आमचं अस्तित्व मान्य करावं अशी मागणी केली आहे.























