(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News : 11 वर्षाच्या मुलाने घरातच लावला गळफास, आत्महत्येचं कारण अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू
Nagpur News : अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Nagpur News : नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील डिगडोह येथे एका 11 वर्षीय मुलाने घरातल्या खोलीतच पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
आत्महत्येचं कारण अस्पष्ट
एका 11 वर्षीय मुलाने घरातल्या खोलीतच पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतल्याचे पाहून त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. तसेच या मुलाने आत्महत्या का केली असावी? याबाबत कुटुंबियांनाही काहीच माहिती नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आत्महत्येचं कारणही अस्पष्टच आहे. एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.
लेखक राजन खान यांच्या मुलाची चिठ्ठी लिहित आत्महत्या
काल पुण्यात देखील अशाच प्रकारे घटना घडली. लेखक राजन खान यांच्या आयटी अभियंता मुलाने आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली. पुण्यातील सोमटने फाटा येथे ही घटना सोमवारी सायंकाळी समोर आली. डेबू राजन खानने गळफास घेत आयुष्य संपवलं. आर्थिक विवंचनेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, तसा उल्लेख आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे.
अनेक कारणांसाठी मुलं आपलं जीवन संपवतात
अशी अनेक कारणे आपण ऐकत असतो. अगदी शाळेसाठी दप्तर दिले नाही, यापासून ते मोबाइलवर गेम खेळण्यास मनाई केली किंवा पालक रागावले, इंटरनेटवरील साइटवर असणारी माहिती पाहून, कुतूहल म्हणून तसे करण्याचा प्रयत्न करणे, या आणि अशा अनेक कारणांसाठी मुलं आपलं जीवन संपवून टाकतात. काही मुलांची कारणे तर जीवाला चटका लावून जाणारी असतात. वाढत्या वयासोबत येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मुलांनी पालकांशी चर्चा करून मिळवावी, त्यासाठी पालकांचा आपल्या मुलांसोबत संवाद साधणे गरजेचे आहे, तसेच ते त्यांच्या मुलांच्या हिताचेही नक्कीच आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या