नागपूर : धडाडीचे पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या विश्वास नांगरे पाटील (Vishwas nangare patil) यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आयुक्तपदावरुन थेट नागपूरला बदली करण्यात आली आहे. नागपूरच्या (Nagpur) पोलीस आयुक्तपदी आज त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिला आणि लहान मुलांचे संरक्षण हीच आपली प्राथमिकता असल्याचे म्हटले. तर, सानपाडा येथील संघ परिवाराच्या कार्यक्रमातील व्हायरल व्हिडिओबाबतही (Video) त्यांनी स्पष्टीकरण दिले. या व्हिडिओवरुन होणाऱ्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले असून मी त्या (संघाच्या) कार्यक्रमात जाऊन कुठेही माझ्या नोकरीच्या सेवा शर्तीचे उल्लंघन केले नाही, असेही नांगरे पाटील यांनी म्हटले. 

Continues below advertisement

संघाच्या कार्यक्रमातील सहभाग आणि झालेल्या वादावर बोलताना विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, मला सगळ्यांचा प्रचंड आदर आहे, मी पोलिस सेवेचा अधिकारी असून माझी पूर्ण कटिबद्धता संविधानाशी आणि त्याच्या मूल्यांशी आहे. नागपुरात दीक्षाभूमी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार माझे मार्गदर्शक आहेत, विविध संघटन, संस्था यांच्या कार्यक्रमामध्ये जाणे आणि तिथे उपस्थित लोकांना भेटणे स्वभाविक आहे, असे नांगरे पाटील यांनी म्हटले. कार्यक्रमातील भाषणाबद्दल जे आक्षेप घेतले जात आहेत, तो 19 एप्रिलचा कार्यक्रम आहे. त्यासाठी सानपाडा येथील कार्यकर्ते निमंत्रण घेऊन आले होते. त्यामध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिक होते. GST संदर्भात मार्गदर्शन तिथे झाले, आध्यात्मिक मार्गदर्शन ही त्याठिकाणी काही तज्ञांनी केले. 

मी गेली 30 वर्ष पोलीस सेवेत आहे. मी रमजान ईदला जातो, जैन, शीख धर्माच्या कार्यक्रमात जातो, त्याच अनुषंगाने मी तिथेही गेलो होतो, असे स्पष्टीकरण नांगरे पाटील यांनी दिले. आम्ही इफ्तार पार्टीलाही जातो, त्याच मालिकेत मी याही कार्यक्रमात गेलो. त्यात मी मानवी कल्याणासाठीच्या सामूहिक प्रार्थना बोलून दाखविल्या. त्या भाषणामध्ये मी ज्ञानेश्वरीतील प्रार्थनाही बोलून दाखविली अमली पदार्थांच्या तरुणाईला होणाऱ्या हानीबद्दल देखील बोललो. त्याशिवाय पोलिस दलातील संधी बद्दल बोललो, त्यामुळे त्या (संघाच्या) कार्यक्रमात जाऊन कुठेही मी माझ्या नोकरीच्या सेवा शर्तीचे उल्लंघन केलेले नाही, असेही नांगरे पाटील यांनी म्हटले. ते क्रार्यक्रम वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे आणि rss ला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल होते. त्यामुळे मी कुठल्याही नियमाचे उल्लंघन केले असे वाटत नाही, असे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले. 

Continues below advertisement

मुख्यमंत्र्यांनी विश्वास दाखवला

मी नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी कार्यभार स्वीकारला आहे. ऑरेंज सिटी आणि टायगर कॅपिटलमध्ये पहिल्यांदाच काम करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जो विश्वास दाखवला आहे, ते पाहता ही मोठी जबाबदारी आहे. कायदा सुव्यवस्था राखणे, कोर पोलिसिंग करणे, महिला आणि लहान मुलांना सुरक्षित ठेवणे हे माझे प्राधान्य राहील. आमच्या खांद्यावर "IPS" लिहिलेले आहे, त्यातील "S" हे सर्विस म्हणजेच लोकांच्या सेवेसाठी आहे. त्यामुळे फक्त गुन्हेगार हेच पोलिसांना घाबरले पाहिजे, सर्वसामान्य हे पोलिसांना घाबरता कामा नये, असे नांगरे पाटील यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा

संघाच्या कार्यक्रमानंतर 'राज'कीय टीका; विश्वास नांगरे पाटलांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण, म्हणाले, मी कुठल्याही नियमांचे उल्लंघन