नागपूर : चीनच्या सीमेवर भारतीय सैन्य चीनच्या कुरापतींचा सामना करत असताना तरुणाई मात्र चिनी टिकटॉकच्या जाळ्यात अडकली आहे. नागपुरात तर गुन्हेगारांनी आणि गुन्हेगारीचा आकर्षण असलेल्या काही तरुणांनी टिकटॉकच्या माध्यमातून आपली दादागिरी प्रस्थापित करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे अनेक नागपूरकरांनी गुन्हेगारीसाठी टिकटॉकच्या अशा वापराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
नागपूरच्या तरुणांच्या टिकटॉक व्हिडीओमध्ये चित्रपटांच्या डायलॉगवर तरुण ऐकमेकांना मारण्याची धमकी देत आहेत. काहींना त्यांना आलेल्या वाईट कमेंटचा वचपा काढायचा आहे. तर काही तर नागपूरला क्राईम सिटी म्हणून थेट पोलिसांनाच आव्हान देत आहेत. त्यामुळे नागपुरात टिकटॉकच्या माध्यमातून भविष्यातील गुन्ह्यांचा बीजारोपण होतंय की काय अशी शंका निर्माण झाली आहे. सध्या नागपुरात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ वायरल होत असल्याने सामान्य नागपूरकरांनी त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी समोर येऊ लागली आहे.
पोलिसांची वर्दी घालून टिक टॉक बनवणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
टिकटॉकचा दहशत निर्माण करण्यासाठी वापर
सोशल मीडियावर गुन्हेगारांचे असे अनेक व्हिडिओ वायरल होत असल्याने सध्या काही महाविद्यालयीन तरुणही त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवत तसेच व्हिडीओ बनवून एकमेकांना पाठवत आहेत. दुसरकीकडे अनेक तरुणींनी आपली दबंगगिरी दाखवण्यासाठी टिकटॉकचा आधार घेतला आहे. मानसोपचार तज्ज्ञांना मात्र तरुणाईकडून टिकटॉकचा गुन्हेगारीसाठीचा किंवा आपली दहशत निर्माण करण्यासाठीचा वापर जास्त धोकादायक वाटतोय. नागपूर सारख्या शहरात जिथे आधीच गुन्हेगारीच्या घटना जास्त आहेत. तिथली तरुणाई जर अशा नकारात्मक स्वरूपात सोशल मीडियाचा वापर करणार असेल तर भविष्यात याच माध्यमातून आणखी गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.
दुसऱ्या बाजूला तज्ज्ञांना टिकटॉक भारतीय तरुणांची माथी फिरवण्याचा माध्यम वाटतंय. आयटी तज्ज्ञांच्या मते सोशल मीडियावर बहुतांशी व्हिडीओ किंवा पोस्ट फक्त लाईक्स/पसंती मिळवण्यासाठी पोस्ट केल्या जातात. नेमकं हेच लक्षात घेऊन टिकटॉकने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर फक्त लाईक्सचेच पर्याय उपब्ध करून दिले आहे. जर तुम्हाला एखादा व्हिडिओ आवडला नाही तर तुम्ही टिकटॉकवर त्याला डिसलाईक/नापसंत करू शकत नाही. कारण तिथे नापसंतीचे पर्याय दिलेलेच नसते. त्यामुळे टिकटॉक वापरणाऱ्याला तो काय चूक करत आहे हे कधी ध्यानीच येत नाही.
या आधी पण नागपुरात सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकमेकांना दिलेल्या आव्हानातून गुन्हे घडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सध्या टिकटॉकच्या माध्यमातून सुरू झालेल्या धमकीवजा व्हिडीओ पोस्ट करण्याची ही मालिका नागपूर पोलिसांनी खंडित करण्याची गरज आहे.
India China Dispute | भारत-चीनच्या मेजर जनरल स्तरावरच्या अधिकाऱ्यांमध्ये आज बैठक