Nagpur Crime News : घरात होणाऱ्या सततच्या वादाला कंटाळून एका पित्यानेच स्वतःच्या मुलांना विष पाजून संपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वतःने आत्महत्या केली. नागपुरातील वाठोडा परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.


कौटुंबिक कलहातून मुलांना विष पाजून त्यांचा गळा आवळला नंतर वडिलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही थरारक घटना वाठोडा पोलिस स्टेशन हद्दीतील वैष्णवदेवीनगर येथे उघडकीस आली. या घटनेने समाजमन सुन्न झाले असून, पोलिसांमध्येही खळबळ उडाली आहे. मनोज अशोक बेले (वय 45 वर्षे) आणि त्यांची मुलगी तनिष्का (वय 7 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. तर प्रिन्स (वय 12 वर्षे) याचा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये जीवनमृत्यूशी संघर्ष सुरु आहे.


दर रविवारी मुले वडिलांना भेटायची, पण यंदा...


पोलिसांनी (Nagpur Police) दिलेल्या माहितीनुसार, मनोज हे मेकॅनिक होते. मेडिकल चौकात त्यांचे दुकान आहे. तनिष्का दुसरीत तर प्रिन्स सहाव्या वर्गात शिकत होता. 13 वर्षांपूर्वी मनोज यांचा प्रियासोबत प्रेमविवाह झाला. लग्नानंतर मनोज आणि प्रिया यांच्यात वाद व्हायला लागले. सहा वर्षांपूर्वी वाद विकोपाला गेल्याने प्रिया आणि मनोज यांनी सामंजस्याने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. तनिष्का आणि प्रिन्स हे दोघे प्रिया यांच्याकडे राहायचे. प्रिया या साडी विक्रीच्या दुकानात काम करुन उदरनिर्वाह करतात. मनोजपासून वेगळे झाल्यानंतर दर रविवारी मुले मनोजला सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत भेटायला जातील, असा निर्णयही यावेळी दोघांनी घेतला.


बापानेच मुलांना दिला विषयुक्त नाश्ता


गेल्या काही दिवसांपासून परत दोघांमध्ये वाद व्हायला लागले. 12 जानेवारीला मनोज यांच्या मित्राने प्रिया यांना फोन करुन तिरंगा चौकात भेटायला बोलावले. प्रिया आणि त्यांचे वडील मनोज याला भेटले. यावेळीही दोघांमध्ये वाद झाला. हा वाद नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये गेला. नंदनवन पोलिसांनी दोघांना भरोसा सेलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. सतत वाद होत असल्याने मनोज तणावात राहायला लागले. रविवारी सकाळी प्रिया यांचे वडील प्रिन्स आणि तनिष्काला घेऊन वाठोडा चौकात आले. प्रिन्स आणि तनिष्काला मनोजच्या स्वाधीन केले. मनोज दोन्ही मुलांना घेऊन घरी गेला. त्यांच्यासोबत खेळला. त्यांना नाश्ताही दिला. दुपारी 4.30 वाजतापर्यंत प्रिन्स आणि तनिष्का घराबाहेर खेळत होते. मनोजने त्यांना आवाज देऊन घरात बोलावले. त्यांना पुन्हा नाश्ता दिला. यात विष होते. दोघेही बेशुद्ध झाले. मनोजने दोरीने दोघांचा गळा आवळला. त्यानंतर लाकडी बल्लीला दोरी बांधून स्वत: गळफास घेतला.


ही बातमी देखील वाचा...


आता बेरीज वजाबाकीच्या राजकारणास सुरुवात ; मविआ आणि भाजपमध्ये मुकाबला...