नागपूर : नागपुरात भाजपसोबत राजकीय संघर्ष करण्याच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस चुकीच्या लोकांना पक्षात प्रवेश देत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण अवघ्या दोन महिन्याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अल्पसंख्यांक समाजाचा तरुण चेहरा म्हणून ज्या गुलाम अश्रफीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला होता. त्याच गुलाम अश्रफीला नागपूर पोलिसांनी काल (31 मे) रात्री बँक ऑफ महाराष्ट्रासह इतर काही बँकांच्या तसेच अनेक गरीब टॅक्सी चालकांच्या फसवणूक प्रकरणी अटक केली आहे.
गुलाम अश्रफीने त्याच्या 'यंग फोर्स' या संघटनेच्या माध्यमातून शेकडो गरीब टॅक्सी मालक तसेच इतर वाहन मालकांची फसवणूक केल्याचं समोर आले आहे. पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गुलाम अश्रफी गरीब वाहनचालकांना बँकेतून कर्ज घेऊन महागडे वाहन खरेदी करायला लावायचा. जेव्हा ते बँकेचे हस्ते भरण्यास अपयशी ठरायचे तेव्हा सुरुवातीला त्यांना बँकेच्या वसुली पथकाच्या कारवाईपासून संरक्षण द्यायचा आणि नंतर स्वतः बँकेसोबत सेटलमेंट करुन हफ्ते थकल्यामुळे जप्त झालेले वाहन लिलावात कवडीमोल भावात स्वतः खरेदी करायचा. याच पद्धतीने गुलाम अश्रफी ने अनेक ट्रक्स, जेसीबी, फॉर्च्युनर सारख्या महागड्या गाड्या आणि अनेक मालवाहतूक वाहन आपल्या नावावर करुन घेतल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
एवढेच नाही तर गुलाम अश्रफीने स्वतःला कोळसा विभागाच्या अंतर्गत काम करणाऱ्या वेस्टर्न कोल फिल्ड्स कंपनीचा अधिकारी सांगत खोट्या सॅलरी स्लिप आणि इतर कागदपत्रे तयार करुन बँक ऑफ महाराष्ट्रातून एकदा एक कोटी रुपयांचा तर दुसऱ्यांदा नव्वद लाख रुपयांचा कर्जही उचलले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र आणि इतर काही वित्तीय संस्थांनी त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर सखोल तपास करुन पोलिसांनी काल रात्री गुलाम अश्रफीला अटक केली आहे. इतर काही वाहनचालकांची गुलाम अश्रफी ने अशाच पद्धतीने फसवणूक केली असेल तर त्यांनी निर्धास्तपणे पोलिसांकडे संपर्क साधावे आणि आपली तक्रार द्यावी असे आव्हान पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी केले आहे. विशेष म्हणजे गुलाम अश्रफी विरोधात यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे नागपूरच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यामध्ये मारहाण करणे, धमकावणे, खंडणी वसूल करणे, दंगल करणे यासह हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल आहे.