नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शतक महोत्सवी वर्षाला गुरुवारी स्थापना दिनापासून सुरुवात झाली. शतक महोत्सवी वर्षांचा शुभारंभ भव्यदिव्य स्वरूपात करण्यात आला. संपूर्ण विद्यापीठात मागील अनेक दिवसांपासून या सोहळ्याचा उत्साह संचारला आहे. दरम्यान या उत्साहात विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू व कुलसचिव विद्यापीठाच्या यशात मोलाची भूमिका वठविणाऱ्यांनाच निमंत्रण देण्याचे विसरल्याचे समोर आले आहे. विद्यापीठ अधिकाऱ्यांच्या या धोरणाविरुद्ध सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान अनेकांना व्हॉट्सअॅपवरून निमंत्रण मिळाल्याचेही सांगितले.


शतक महोत्सवी उद्घाटन सोहळ्याला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व कुलपती डॉ. अनिल काकोडकर यांनी उपस्थिती लावली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यस्त कार्यक्रमामुळे हजेरी लावली नसली तरी या सोहळ्याला व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. सोहळ्यापूर्वी पत्रकार परिषदही कुलगुरूंनी घेतली नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त करीत विद्यापीठाने आतापर्यंतची परंपराच मोडित काढल्याचा आक्षेप नोंदविला. शतक महोत्सवा दरम्यान वर्षभर कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्याची सुरुवात गुरुवारी झाली. 


कुलगुरू, सिनेट सदस्यांचाही समावेश 


सोशल मीडियावर या कार्यक्रमानंतर विद्यापीठाशी संबंधित असलेल्या अनेकांचा संताप उमटू लागला. अनेक वर्षे विद्यापीठाच्या सिनेटसह विविध प्राधिकरणात काम केलेल्या प्राध्यपकांना व ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञांना देखील निमंत्रण मिळाले नसल्याचे समोर आले. विशेष म्हणजे शतक महोत्सवासाठी तयार केलेल्या पालक समितीमधील अनेक गणमान्य व्यक्तींनाही निमंत्रण पोहचले नाही, अशी माहिती समोर आली. विद्यापीठाचे सर्वोच्च पद भूषविलेल्या व  विकासात योगदान देणाऱ्या एका कुलगुरूंना निमंत्रण देण्यात नाही अशी माहिती मिळाली. 


समाजाशी संवाद तुटला


मागील काही दिवसांत विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचा समाजाशी संवाद तुटल्याचे मत आक्रमकपणे गुरुवारच्या सोहळ्यानंतर व्यक्त करण्यात आले. विद्यापीठात वर्तमान अधिकारी निर्णय घेत असले तरी विद्यापीठ ही निरंतर चालणारी संस्था आहे, त्यात सर्वांचा सहभाग असणे आवश्यक आहे. मात्र विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी समाजाशी संवाद तोडला असल्याची भावना व्यक्त केली.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI