नागपूर : विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय हा विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती घेतील, तो आमचा निर्णय नाही असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अध्यक्ष आणि सभापती जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असंही ते म्हणाले. सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Winter Session) सुरुवात होणार असले तरी विधानसभा आणि विधान परिषदेला विरोधी पक्षनेता नाही. त्यावर विरोधकांनी सरकारवर टीकाही केली आहे. त्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस बोलत होते.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने टाकलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचा समाचार घेतला. यंदाच्या अधिवेशनात आम्ही 18 विधेयकं मांडणार असून ती सर्व मंजूर करण्याचा प्रयत्न करू असंही फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis Nagpur PC : देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मंत्रीमंडळ बैठक पार पडली आहे. चहापानाचा कार्यक्रम होता. विरोधी पक्षाने परंपरा पाळत बहिष्कार टाकला. त्यामुळे आम्हाला आमचा चहा प्यावा लागला. विरोधी पक्षाची पत्रकार परिषद त्रागा करणारी होती. अनेक गमती झाल्या, भास्कर जाधवांनी विजय वडेट्टीवार यांच्या माईकची बॅटरी बंद केली. विरोधी पक्षाचे पत्र उशिरा आले, त्यावर शरद पवार गटाच्या कोणाचीच सही नाही. याचा मी वेगळा अर्थ काढणार नाही.
वडेट्टीवार विदर्भावर बोलले. मात्र त्यांनी 2014 पूर्वीचा विदर्भ आणि आताचा विदर्भ बघावा. त्यांचा जिल्ह्याच्या बाजूला असणारे गडचिरोली बघावं.
कोणावरच आता विरोधकांना विश्वास उरला नाही आहे. संवैधानिक संस्थांवर आगपाखड करत आहेत. राज्य दिवाळखोर दाखवण्याची घाई विरोधकांना झाली आहे. ओढाताणीची परिस्थिती असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चालले नाही. याचा अर्थ हा मूळीच नाही आमच्याकडे खूप पैसे आहेत. योजना पूर्ण करायला पैसे आहेत आणि आम्ही ते देत आहोत. केवायसीचा प्रश्न आम्ही सोडवत आहोत. शेतकऱ्यांना देखील मदत मिळणार आहे. पावसाची मदत आणि 10 हजार रुपयांची मदत देखील दिली आहे.
अधिवेशनात आम्ही सर्व गोष्टींवर चर्चा करायला तयार आहोत. आम्ही समर्पक उत्तर देऊ. अधिवेशन लहान आहे हा मुद्दा मांडला. आचारसंहितेमुळे पूर्ण अधिवेशन घेऊ शकत नाही. जास्तीत जास्त कामकाज करायला आम्ही तयार आहोत. पळून जायची मानसिकता आमची नाही.
विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय अध्यक्ष आणि सभापतींच्या हाती आहे. अध्यक्ष आणि सभापती घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. आग्रह नाही आणि दुराग्रह देखील नाही. विरोधकांकडे मुद्दे नाहीत आणि ते रेटून नेण्याची मानसिकता देखील नाही. नागपूरचे अधिवेशन रात्री उशिरा चालतं, प्रत्येक दिवशी 10 तास कामकाज चालतं.
छोटे मोठे 18 विधेयकं आम्ही मांडणार आहोत आणि ती सगळी मंजूर व्हावीत यासाठी आम्ही प्रयत्न करू. जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकारचा प्रयत्न असेल
ही बातमी वाचा: