Datta Meghe Passes Away नागपूर : माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन (Datta Meghe Passes Away ) झालं आहे. वयाच्या 89 वर्षी हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचे निधन झाले आहे. दत्ता मेघे हे काँग्रेसचे सरकार असताना नागपूरचे पालकमंत्री होते.  त्यासोबतच रामटेक, वर्धा लोकसभा मतदार संघातून ते खासदार म्हणून देखील निवडून गेले होते. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव काम होते. ते हिंगणा विधानसभा मतदार संघातील भाजप आमदार समीर मेघे यांचे वडील आहेत. 

विदर्भातील तीन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते

दत्ता मेघे यांच्या निधनाने विदर्भासह राज्याच्या राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मेघे यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे झाला होता. त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपमध्ये काम करत चार वेळा लोकसभा खासदार म्हणून नागपूर, रामटेक व वर्धा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले. विदर्भातील तीन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते आहेत. राज्यसभेतही सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. राज्याचे ते विरोधी पक्षनेतेही राहिले.याशिवाय राज्यसभा सदस्य तसेच महाराष्ट्र विधानपरिषदेतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.

दत्ता मेघे यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ

दत्ता मेघे यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दत्ता मेघे यांनी राजकारणासोबतच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. नागर युवक शिक्षण संस्थाच्या माध्यमातून तसेच ‘ दत्ता मेघे इन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्स’सारख्या संस्थांच्या उभारणीतून त्यांनी ग्रामीण भागात शिक्षण व आरोग्य सुविधा पोहोचवल्या. त्यांच्या कार्यामुळे विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांना संधी मिळाली. मेघे हे विदर्भ राज्याच्या मागणीचे समर्थक म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढीही राजकारणात सक्रिय असून पुत्र समीर मेघे आमदार आहेत.

दत्ताभाऊ मेघे माझ्या ज्येष्ठ बंधूंसारखे, त्यांच्या निधनाचे वृत्त दुःखद : गडकरी 

ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री आणि माझ्या ज्येष्ठ बंधूंसारखे असलेले दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. दत्ताभाऊंच्या जाण्याने विदर्भाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा भावना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यक्त केल्या.