नागपूर :  नागपूर शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी शहरात दररोज निर्माण होणारा बांधकाम आणि बांधकाम तोडीचा कचरा अर्थात मलबा गोळा करण्याचे काम नागपूर महानगरपालिकेतर्फे नुकतेच सुरु करण्यात आले आहे. या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानात मोठी भर पडणार आहे. मनपातर्फे या कामासाठी ए.जी. एन्व्हायरो इंजिनियर लिमिटेड अंतर्गत कार्यरत हैद्राबाद सी.अँड डी. वेस्ट प्रा. कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीतर्फे नागपूर महानगरपालिका हद्दीतील बांधकाम व मलब्यावर पुनर्वापर प्रक्रिया करण्यात येणार आहे. 


मनपाद्वारे नियुक्त ऑपरेटर्सनी सर्वप्रथम शहरातील सर्व भागाचे सर्वेक्षण केले आणि लक्ष्मीनगर झोनपासून बांधकाम आणि मलबा गोळा करणे सुरु केल्याचे मनपाच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी सांगितले. यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी आणि उपद्रव शोध पथकाचे जवान उपस्थित होते. सदर कंपनीला प्रक्रिया युनिट तयार करण्यासाठी मनपातर्फे भांडेवाडी येथे 5 एकर देण्यात आलेली जमीनवर निर्माणकार्य डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. कंपनी प्रतिदिवस जवळपास 200 टन सी.अँड डी. कचऱ्यावर पुनर्वापराची प्रक्रिया करणार आहे. यातून बांधकामाला लागणारे साहित्य जसे, रेती, विटा, पेव्हरब्लॉक, टाईल्स बनविण्यात येणार आहे. सी.अँड डी. कचरा शहरातून गोळा करण्यासाठी संपूर्ण पायाभूत सुविधांची व्यवस्था कंपनी करणार आहे. या प्रकल्पामुळे शहरात रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागांवर, निवासी भागातील सी. अँड डी. कचरा पूर्णपणे कमी होईल. यामुळे नागपूर शहर अधिक स्मार्ट आणि स्वच्छ होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता (पर्यावरण) यांनी दिली.


मनपाच्या पथकांकडून 61 पीओपी मूर्ती जप्त, विक्रेत्यांना 1 लक्ष 66 हजार रुपयांचा दंड


उच्च न्यायालयाने पीओपी मूर्तीवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने बुधवारी आणि गुरुवारी पीओपी मूर्ती विकणाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबविली. 390 मूर्ती विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी केली. पथकाने विक्रेत्यांकडील 61 पीओपी मूर्ती जप्त करुन 1 लक्ष 66 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या आदेशानुसार पीओपी मूर्तीची विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कारवाई करण्याची जबाबदारी झोन कर्मचारी व एनडीएस पथकांवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळपासून पथकांनी शहराच्या विविध भागातील मूर्ती विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी केली.  



प्लास्टिक विरुद्धच्या कारवाईत 60 हजारांचा दंड वसूल


स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी 06 प्रतिष्ठानांवर कारवाई करून  60 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ, धंतोली आणि गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 11 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धरमपेठ झोन अंतर्गत शंकर नगर येथील सुर्या एजन्सी यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील गुरुनानक स्टेशनरी या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच गांधीबाग झोन अंतर्गत पातालेश्वर मंदीर येथील माहाविर ट्रेडर्स यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.