नागपूर: ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागपूरच्या प्रभाग 14 मधील गिट्टीखडान परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये "काँग्रेसने केला धोका, लाडकी बहिणींचा हप्ता थांबवायला लावला" (Ladki Bahin Yojana) अशा आशयाचा पत्र काही अज्ञात लोक घरा बाहेर ठेवत होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना थांबविले असता ते पळून गेले. काँग्रेसने पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात लेखी तक्रार दिली असून प्रभाग 14 च्या भाजप उमेदवार प्रगती पाटील यांचे पती अजय पाटीलचे काही सहकारी हे कृत्य करत असल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार अभिजीत झा यांनी केला आहे. विशेष म्हणजे काही अज्ञात लोक घरांसमोर काही कागद ठेवत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. पोलिसांनी तसेच निवडणूक आयोगाने या घटनेकडे लक्ष घालून योग्य कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस उमेदवार अभिजीत झा यांनी केली आहे.(Ladki Bahin Yojana)
नेमकं प्रकरण काय?
“लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट देण्यासाठी 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे तीन हजार जमा होणार,” अशा आशयाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये काँँग्रेसने देखील तक्रार करत निवडणूक आयोगाने दखल घ्यावी अशी मागणी केली होती, त्यासंदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहिण योजनेसंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे, असे राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना कळविले होते.
“राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचार संहितेबाबत एकत्रित आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशातील तरतुदींनुसार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेली विकासकामे व योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवण्यास परवानगी आहे,” असे मुख्य सचिवांनी आपल्या अहवालात कळवले होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, या योजनेचा नियमित लाभ देता येईल; परंतु अग्रिम स्वरुपात लाभ देता येणार नाही; तसेच नवीन लाभार्थी देखील निवडता यणार नाहीत, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले. त्यामुळे, लाडक्या बहिणींना 3000 ऐवजी 1500 रुपये देण्यास परवानगी मिळताच, मतदानाच्या दोन दिवस अगोदर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता नागपुरात याचे पडसाद उमटल्याचं दिसून आलं आहे, "काँग्रेसने केला धोका, लाडकी बहिणींचा हप्ता थांबवायला लावला" अशा आशयाचा पत्र काही अज्ञात लोक घरा बाहेर ठेवत होते. हे काम भाजपच्या उमेदवारांचं असल्याचं काँग्रेस उमेदवारानं म्हटलं आहे.
15 जानेवारीला मतदान
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान आहे. तर, महायुतीतील दोन घटकपक्षांच्या उमेदवारांकडून त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून येत्या 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार असल्याचा दावा केला जात होता. सरकारकडून मकरसंक्रातींच्या दिवशी निधी वितरित करण्यात आला तर निवडणुकीच्या आचारसंहितेचा हा भंग नाही का असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला होता.
