Chandrashekhar Bawankule : फडणवीसांच्या सूचनेचे पालन केलं नाही, बावनकुळेंनी नागपुरातल्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
Nagpur DPDC : लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचे अधिकाऱ्यांनी पालन केलं पाहिजे असं म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली.

नागपूर : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. गेल्या वर्षी नियोजन समितीच्या बैठकीच्या वेळेला तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्री होते. त्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना ज्या काही सूचना दिल्या होत्या त्याचे किती पालन झाले आहे, त्या संदर्भात विविध विभागांनी काय कारवाई केली आहे, याची माहिती विद्यमान पालकमंत्री बावनकुळे यांनी विचारली. तेव्हा अनेक अधिकारी त्या संदर्भात समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. त्यानंतर बावनकुळेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मागील बैठकीत लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचे पालन न करण्याची अधिकाऱ्यांची ही वृत्ती योग्य नसल्याचे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली. एवढंच नाही तर बैठकीतूनच बावनकुळेंनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून नागपुरातील काही अधिकारांची तक्रार सुद्धा केल्याची माहिती आहे.
अधिकाऱ्यांनी सूचनांचे पालन करावे
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जेव्हा बावनकुळे प्रसारमाध्यमांशी बोलत होते तेव्हा एबीपी माझा ने यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारले. तेव्हा बावनकुळेंनी अधिकाऱ्यांनी मागील बैठकीत तत्कालीन पालकमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या सूचनाचे अनुपालन योग्यरित्या केले नसल्याचे मान्य केलं. त्यामुळेच अधिकाऱ्यांची कानउघडनी केल्याचं त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी लवकरच लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "हे खरं आहे की मागील बैठकीच्या अनुपालनामध्ये आमचे प्रशासन कमी पडले होते. मागच्या वेळेला ज्या काही सूचना लोकप्रतिनिधीकडून देण्यात आल्या होत्या, त्याचा योग्य पालन करण्यात आलं नाही, हे आजच्या बैठकीत लक्षात आले. कदाचित निवडणुकीमुळे ते अनुपालन करण्यामागे मागे पडले असतील. मात्र असे व्हायला नको होते, आज अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींच्या सूचनावर अनुपालन करण्याचे निर्देश नव्याने दिले आहे."
जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचाराची चौकशी करणार
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "जलजीवन मिशनमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. त्याचे चौकशीसाठी आम्ही सर्व प्रकरण इओडब्ल्यू किंवा विशेष एसआयटी नेमून त्याच्याकडे देण्याचा विचार करत आहोत. महिन्याभरात या संदर्भात काही ठोस गोष्टी समोर येतील."
नागपूरसाठी अतिरिक्त निधीची मागणी
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्व आमदार उपस्थित होते. यावर्षीचा डीपीडीसीचा 1200 कोटी रुपयांचा प्लॅन असला पाहिजे असे ठरले आहे. त्याशिवाय आदिवासी विकासासाठीचे 150 कोटी आणि दलित वस्ती सुधार योजनेची 250 कोटी अतिरिक्त मागण्याचे ठरवले आहे. यापूर्वीचा नागपूरच्या जिल्हा नियोजन समितीचा आकार 870 कोटींचा होता.
ही बातमी वाचा:























