Indian Pangolin Rescued in Bhandara : वनविभागाच्या पथकाद्वारे दुर्मिळ खवले मांजराची विक्री करणाऱ्यांवर सापळा रचून कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 19.915 किलोंचे खवले मांजर जप्त करुन दोघांना अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार खवले मांजर अनुसूची 1 मधील अत्यंत दुर्मिळ आहे, हे विशेष. अलिकडे जंगलात जंगली प्राण्यांच्या शिकार करुन विक्रीच्या घटना वाढल्या असून यावर नियंत्रणासाठी वन विभागानेही कंबर कसली आहे. यासोबतच वन विभागानेही तस्कर आणि शिकाऱ्यांवर वॉच ठेवणे सुरु केले आहे. या अंतर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भंडारा (Bhandara News) व नागपूर (Nagpur news) वनविभागाच्या (Forest Department) संयुक्त पथकाने खवले मांजर (Indian Pangolin) या वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे अनुसूची 1 मधील अत्यंत दुर्मिळ खवले मांजर जप्त केले आहे.
वनविभागानं अशी केली कारवाई
माहिती मिळाल्यानंतर पथकाने बनावट ग्राहकाद्वारे आरोपींसोबत संपर्क साधला. तसेच ठरलेल्या वेळेनुसार सौदा ठरला आणि आरोपी येताच पथकाने रामेश्वर माणिक मेश्राम (रा. तिड्डी पो. मानेगांव ता. जि. भंडारा, वय - 32 वर्ष) व सचिन श्रावण उके (रा. खमारी (भोसा) पो. नेरी ता मोहाडी जि. भंडारा वय-29 वर्ष), या दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून 19.915 कि.ग्रॅ. वजनाचे जिंवत नर खवले मांजर (Indian Pangolin) जप्त करण्यात आले.
माहिती असल्यास येथे करा संपर्क
वन्य प्राण्यांची शिकार, तस्करी किंवा विक्री या संदर्भात काही माहिती असल्यास नागरिकांनी वनविभागाच्या टोल फ्री क्र.1926 वर कळवावे अथवा जवळच्या वनविभागाच्या कार्यालयात माहिती द्यावी असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.
आरोपींची कसून चौकशी सुरु असून आणखी काही तस्कर हातात लागू शकतात असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे. ही कारवाई नागपूर वनविभागाचे प्रितमसिंह कोडापे, विभागीय वनाधिकारी ( दक्षता) यांच्या नेतृत्वात प्रमोद वाडे ,वनपरिक्षेत्र अधिकारी बुटीबोरी विवेक राजूरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा आय एम सय्यद आदींनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रंगनाथ नाईकवडे, मुख्य वनसंरक्षक नागपूर, राहुल गवई उपवनसंरक्षक, विवेक राजूरकर वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा व संजय मेंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या भंडारा येथील पथकाद्वारे करण्यात येत आहे.
ही बातमी देखील वाचा...