Maharashtra News: नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना केंद्रीय अन्वेषण ब्यूरोनं (CBI) आणखी एक झटका दिला आहे. 2021 मधील सीबीआय अहवाल माध्यमांमध्ये लिक केल्याप्रकरणी अनिल देशमुख यांची मुलगी पुजा देशमुख आणि सून राहत देशमुख यांच्या विरोधात सीबीआईनं आरोपपत्र दाखल केलं आहे. हे आरोपपत्र दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांनी या प्रकरणी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. सध्या अनिल देशमुख हे नागपुरातच (Nagpur City) आहेत. मात्र या प्रकरणी ते कुठलंही वक्तव्य करणार नाही, असं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. सीबीआईनं अनिल देशमुख यांची मुलगी पुजा देशमुख आणि सून राहत देशमुख यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केल्यानंतर पुजा देशमुख तर राहत देशमुख नेमक्या कुठे आहेत, अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत.
नेमकं प्रकरण काय?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून शंभर कोटी रुपयांची वसुली केली होती, असा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह (Police Commissioner Paramveer Singh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर केला होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) अनिल देशमुख यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयनं या प्रकरणी तपास करत अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपपत्रही दाखल केलं होतं.
सीबीआयच्या तपासामध्ये अनिल देशमुख यांच्यावर कुठलाही दोष सिद्ध होत नाही, असं सीबीआयच्या अंतर्गत रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं, असा अहवाल 29 ऑगस्ट 2021 रोजी प्रसार माध्यमांमध्ये लिक करण्यात आला होता. मात्र याबाबत सीबीआयनं असा कुठलाही अंतर्गत रिपोर्ट नसल्याचा दावा करत अहवालाबाबतच्या सर्व चर्चा फेटाळून लावला होता. तर, अहवाल लीक कसा झाला याचा उलट तपास सुरू केला होता. या प्रकरणाचे धागेदोरे पुढे गेल्यानंतर हे रिपोर्ट सीबीआयचे अधिकारी यांना लाच देऊन मिळवल्याचं सीबीआयच्या तपासातून निष्पन्न झालं होतं. याप्रकरणी सीबीआयनं अनिल देशमुख यांचे वकील आणि सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना अटक केली होती. त्याच संदर्भात आता चार्जशीटमध्ये अनिल देशमुख यांची मुलगी पुजा आणि सून राहत यांचा या लीक प्रकरणात सहभाग असल्याचा उल्लेख करत एकूण चार जणांना आरोपी बनवण्यात आलं आहे.
अनिल देशमुखांची मुलगी, सूनेसह आणखी दोघांवर आरोपपत्र
29 ऑगस्ट 2021 मधील सीबीआयचा अहवाल माध्यमांमध्ये लिक केल्या प्रकरणी अनिल देशमुख यांची मुलगी पुजा देशमुख आणि सून राहत देशमुख यांच्यासह आणखी दोघांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सीबीआयनं मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेला अहवाल मिळवण्यासाठी सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना देशमुख यांचे वकिल आनंद डागा यांनी कथित लाच दिल्याचा ठपका या आरोपपत्रात केला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, सीबीआय चौकशी करत होती. या प्रकरणात अनिल देशमुख यांची मुलगी आणि सूनेसह आणखी दोघे आरोपी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ज्यामध्ये अनिल देशमुखांचे नातेवाई विक्रांत देशमुख आणि सयाजीत वायल यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं आहे. सीबीआयनं आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी विक्रांत देशमुख आणि सयाजीत वायल यांची चौकशी केली होती. परंतु ताब्यात घेतलं नव्हतं. त्यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण प्राप्त झालं आहे.