Video: मनसेचा बँकेत सिनेस्टाईल राडा; पोलिसांसमोरच बँक अधिकाऱ्याला कानाशिलात लगावल्या
नागपुरातील येस बँकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन सुरू असून एका मराठी ग्राहकासंदर्भात बँकेने नियमाचं उल्लंघन केल्याचे आरोप करत मनसैनिक आज बँकेत घुसले होते.

नागूपर : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठीच्या (Marathi) मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली असून मुंबईत अमराठी आणि मराठी असा वादही पाहायला मिळत आहे. मराठी भाषेला विरोध करणाऱ्यांना किंवा मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या मनसेकडून चोप दिल्याचे व्हिडिओ देखील समोर आले होते. काही दिवसांपूर्वी नागपूरमधील यूनियन बँकेकडून मराठीतील एफआयआर चालणार नसल्याचे सांगत नुकसानभरपाईसाठी हिंदी किंवा इंग्रजीतील एफआयआर कॉपी हवी असल्याचं प्रकरण तापलं होतं. त्यावेळी, मनसैनिकांनी (MNS) बँकेत घुसून अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर हे प्रकरण शांत झालं, तसेच बँकेने मराठीतील एफआआर कॉपी देखील मान्य केली होती. त्यानंतर, आता नागपुरमधील येस बँकेत घुसून मनसे पदाधिकाऱ्यांनी सिनेस्टाईल राडा केला आहे.
नागपुरातील येस बँकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन सुरू असून इंद्रजीत मुळे नावाच्या एका मराठी ग्राहकासंदर्भात बँकेने नियमाचं उल्लंघन केल्याचे आरोप करत मनसैनिक आज बँकेत घुसले होते. यावेळी संतप्त मनसे पदाधिकाऱ्यांनी येथील एका कनिष्ठ बँक अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याने चांगलाच गोंधळ उडाला आहे. विशेष म्हणजे मनसेच्या आंदोलनामुळे मोठा पोलीस बंदोबस्त बँकेत तैनात करण्यात आला होता. मात्र, पोलिसांसमोरच मनसैनिकांनी बँक अधिकाऱ्यांना झापले.
नागपूरमधील इंद्रजीत मुळे नावाच्या एका मराठी ग्राहकासंदर्भात बँकेने नियमाचं उल्लंघन केल्याचे आरोप करत मनसैनिकांनी आंदोलन सुरू केलं आहे. मुळे यांनी बँकेकडून कर्ज घेऊन खरेदी केलेला जेसीबी बँकेने जप्त केला असून तो जेसीबी इंद्रजीत मुळे यांना कुठलीही नोटीस न बजावता, कोणतीही माहिती न देता नियमबाह्य पद्धतीने परस्पर लिलाव केल्याचा आरोप मनसेनं केला आहे. यासंदर्भात मनसेच्या जवळपास 50 कार्यकर्त्यांनी शहराध्यक्षा चंदू लाडे यांच्या नेतृत्वात माउंट रोडवरील येस बँकेच्या शाखेत राडा घातला. मनसे कार्यकर्त्यांसोबत पीडित बँक ग्राहक इंद्रजीत मुळे हे देखील उपस्थित होते. पोलीस मनसेच्या कार्यकर्त्यांना बँकेच्या आत प्रवेश करू देत नसल्याने पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचंही पाहायला मिळालं.
चौथ्या मजल्यावर जाऊन बँक अधिकाऱ्यास मारहाण
पोलिसांच्या विरोधानंतरही मनसे कार्यकर्ते बँकेत घुसले होते, आणि या प्रकरणाशी संबंधित तरुण अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत जाबही विचारला. जेव्हा मनसे कार्यकर्ते तिसऱ्या माळावरील बँकेच्या मुख्य प्रवेश दाराला सोडून चौथ्या माळावरील दारावर पोहोचले, तेव्हा प्रवेश केल्यानंतरच्या लॉबीमध्येच संबंधित कनिष्ठ अधिकारी काही मनसे कार्यकर्त्यांच्या हाती लागला. त्यावेळी, त्याला मनसे कार्यकर्त्यांनी तिथेच दोन-तीन चापट मारल्या. ज्याला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली तो या कर्ज प्रकरणाशी संबंधित बँकेचा कनिष्ठ अधिकारी आहे.
हेही वाचा
मोठी बातमी! माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन; दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
























