नागपूर: अंडरब्रीजसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून एका 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना कळमनाच्या डिप्टी सिग्नल परिसरात घडली. पृथ्वी धनीराम मारखंडे असे मृत मुलाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार रेल्वे अंडरब्रीज बनविण्यासाठी परिसरात मोठा खड्डा खोदण्यात आला होता. नंतर तांत्रिक अडचणींमुळे ते काम बंद झाले, मात्र खड्डा तसाच राहिला. पावसाचे पाणी साचून त्याला तलावाचे रुप आले. पृथ्वी त्या खड्ड्याजवळ मित्रांसोबत खेळत असताना तो खड्ड्यात पडला आणि त्याचा बुडून त्याचा मृत्यू झाला. प्रशासनाच्या निष्काळजीपणाने एका मुलाचे प्राण घेतले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे.
अनेक महिन्यांपासून काम बंद
पृथ्वीचे वडील मजुरी करतात. आई गृहिणी आहे. डिप्टी सिग्नलच्या वैरागडे वाडीत जवळपास वर्षभरापूर्वी अंडरब्रीज बनविण्याचे काम सुरू करण्यात आले. अंडरब्रीजसाठी बुलडोझरने तेथे खोल खड्डा खोदण्यात आला. कळमनाकडून इतवारीकडे जाणाऱ्या रेल्वे लाईनखाली हा आरयूबी बनणार आहे. हा रस्ता डिप्टी सिग्नलला शांतीनगरशी जोडणारा आहे. कामादरम्यान खड्ड्यात अनेक केबल दिसले. ते केबल कुठले आणि कोणत्या विभागाचे होते याची माहिती मिळाली नाही. अशात काही दिवसानंतर काम बंद करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, अनेक महिन्यांपासून येथे कंत्राटदाराने काम बंद करून ठेवले आहे. आता पावसाचे पाणी साचल्याने त्या खड्ड्याला तलावाचे रुप आले आहे. परिसरातील मुले तेथे आंघोळ करू लागले. गुरुवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास पृथ्वी आणि त्याचे तीन मित्र तलावाच्या तटावर पाण्यात खेळत होते. या दरम्यान चिखलात पाय घसरल्याने पृथ्वी पाण्यात पडला.
अग्निशमन कर्मचाऱ्यांनी काढला मृतदेह
मित्रांनी आरडा-ओरड करून स्थानिक नागरिकांना माहिती दिली. लोकांनी पोलिस आणि अग्निशमन विभागाला सूचना दिली. तत्काळ कळमना, सुगतनगर, लकडगंज आणि गंजीपेठ येथून अग्निशमन कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. गळ टाकून पृथ्वीला शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. अंधारामुळे शोध मोहीम थांबविलीच जाणार होती की, अग्निशमन कर्मचारी श्रीकृष्ण नरवटे यांनी पाण्यात उडी घेतली आणि पृथ्वीचा मृतदेह बाहेर काढला. परिसरात खळबळ उडाली. नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला. कसेबसे पोलिसांनी लोकांची समजूत काढून शांत केले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
अपघातासाठी प्रशासन जबाबदार
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, या घटनेसाठी प्रशासन जबाबदार आहे. पावसाळ्यापूर्वीच हा खड्डा तलाव बनला होता. नागरिकांची याची माहिती प्रशासनाला दिली होती. अनेकदा अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली, मात्र सर्व कुंभकर्णी निद्रेत झोपून होते. वारंवार नागरिक खड्ड्या भोवती तारांचे कुंपण आणि बॅरिकेडिंगची मागणी करीत होते. आंदोलनाचाही इशारा देण्यात आला, मात्र अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या घटनेसाठी प्रशासनच जबाबदार आहे. कंत्राटदाराविरुद्ध तर कारवाई झालीच पाहिजे, मात्र अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.