Share Trading Fraud : शेअर बाजारामध्ये (Share Market News) पैसे गुंतवण्याच्या नावावर मुंबईच्या शेअर ट्रेडर कुटुंबाने नागपूरच्या व्यावसायिकांची 21 कोटी रुपयांनी फसवणूक केली असल्याचं प्रकरण समोर आलं आहे. आरोपी कुटुंबाविरुद्ध मुंबईच्या जुहू पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जास्मिन भोगीलाल शाह, दीपिका जास्मिन शाह आणि विशाल शाह सर्व रा. यतन बिल्डिंग, विले पार्ले अशी आरोपींची नावे आहेत. सिव्हील लाइन्सच्या वृंदावन अपार्टमेंट येथे राहणाऱ्या अभिनव रमाकांत फतेहपुरिया (40) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा (Nagpur Police) नोंदवण्यात आला आहे.
अभिनव हे सिल्व्हर स्टोन इंफ्रास्ट्रक्चरचे संचालक आहेत. त्यांना त्यांच्या कंपनीचे काही पैसे शेअर व्यवसायात गुंतवायचे होते. त्यांचे दोन मित्र राहुल नवलकिशोर अग्रवाल आणि राजकुमार नरसिंगदास अग्रवाल यांना सुद्धा शेअरमध्ये पैसे गुंतवायचे होते. त्यामुळे ते विशेषत: मुंबईच्या शेअर ट्रेडर्सच्या शोधात होते. या संबंधात त्यांनी त्यांचा सीए आणि परिचितांशी संपर्क केला. त्यांचा सीए बी.के. अग्रवाल याने मुंबईच्या जेएनएम रिअलटीच्या जास्मिन शाह बाबत माहिती दिली. त्यांच्याशी गुंतवणुकीबाबत चर्चा ही केली.
75 लाख शेअर्सची खरेदी केल्याची बतावणी
ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2021 दरम्यान अभिनव यांनी जेएनएम रिअलटीच्या खात्यात 7.25 कोटी रुपये टाकले. राहुलने 2.50 कोटी आणि राजकुमारने 11.15 कोटी रुपये खात्यात जमा केले. 31 ऑक्टोबरला जास्मिनने व्हॉट्सअॅप मॅसेज करून 28.25 रुपये प्रति शेअरनुसार 75,50,000 शेअर खरेदी केल्याची माहिती दिली. मात्र शेअर कोणत्या कंपनीचे आहेत हे सांगितले नाही. वारंवार माहिती मागितल्यानंतर डीमॅट खात्यात शेअर खरेदीची यादी पाठवली.
शेअर्सचे खाते स्वतःच्या खात्यात वळते
शेअर रजिस्टरमधून गुंतवणूकदारांना समजले की, आरोपींनी जायस्वाल निको कंपनीत पैसे गुंतवले आहेत. मात्र काही दिवसानंतर आरोपींनी काही न सांगताच शेअर विकण्यास सुरुवात केली आणि गुंतवणूकदारांचे पैसेही परत केले नाही. भविष्यात बक्कळ नफा होण्याचे आमिष दाखवत राहिले. आरोपींनी गुंतवणूकदारांच्या 21 कोटी रुपयांनी खरेदी केलेल्या शेअरपैकी 13.75 कोटी रुपये स्वत:च्या खात्यात वळते केले आणि उर्वरित शेअरही स्वत:कडेच ठेवले. यासंबंधात तिन्ही गुंतवणूकदारांना कुठलीही माहिती नव्हती. अखेर त्रस्त होऊन पीडितांनी प्रकरणाची तक्रार पोलिसात केली. जुहू पोलिसांनी अपहाराचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असून सध्यातरी कुणालाही अटक झालेली नाही.
ही बातमी देखील वाचा...