नागपूर : युनियन बँक ऑफ इंडियाकडून नागपुरातील (Union Bank Of India Nagpur) बोपचे कुटुंबीयांच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणातील नुकसान भरपाई साठीचा अर्ज मराठी दस्तावेज असल्यामुळे नाकारल्या जात असल्याच्या प्रकरणात आता मनसेनेही उडी घेतली आहे. बँकेचा मराठी विरोधातील धोरण योग्य नाही. महाराष्ट्रात एफआयआर मराठीतच असेल आणि तो बँकेने स्वीकारावी, अन्यथा आम्ही बँकेत जाऊन बँक अधिकाऱ्यांना धडा शिकवू, असा इशारा मनसेने दिला आहे.
नागपूरातील योगेश बोपचेच्या मृत्यू प्रकरणी एटीएम कार्ड धारक या नात्याने बँकेकडून मिळू शकणाऱ्या दोन लाखांच्या नुकसान भरपाई संदर्भात बँक बोपचे कुटुंबीयांची अडवणूक करत असल्याची बातमी 'एबीपी माझा'ने दाखवली होती. योगेशच्या अपघाती मृत्यू प्रकरण संदर्भातला एफआयआर मराठीत आहे, तो आम्हाला इंग्रजी किंवा हिंदीत भाषांतर करून द्या, तेव्हाच तुमचा नुकसान भरपाई संदर्भातला अर्ज स्वीकारू, असा संतापजनक धोरण युनियन बँक ऑफ इंडियाच्या सेमिनरी हिल्स शाखेने घेतलं होतं. एबीपी माझा ने बातमी दाखवल्यानंतर मनसेने या प्रकरणी बँक अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.
महाराष्ट्रात मराठी चालणार नाही तर कुठे चालणार?
दुसरीकडे, महाराष्ट्रात मराठी चालणार नाही तर कुठे चालणार? असा संतप्त सवाल अपघाती मृत्यू झालेल्या योगेश बोपचेच्या पत्नी आरतीने विचारला आहे. 8 जूनला योगेशचा मृत्यू झाल्यानंतर गेले अनेक दिवस त्याच्या बँक खात्यातील एटीएम कार्डवर आधारित दोन लाख रुपयांची विम्याची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आम्ही बँकेचे खेटे घालत आहोत. मात्र योगेशच्या मृत्यू संदर्भातला नागपूर पोलिसांचा एफआयआर मराठीत आहे. म्हणून त्याचा अर्ज स्वीकारू शकत नाही, असा संतापजनक धोरण बँकेने स्वीकारला आहे, या संदर्भात योगेशच्या पत्नी आरतीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पतीच्या निधनानंतर दोन लहान मुलांची सांभाळ करण्यासाठी दोन लाख रुपये अत्यंत महत्त्वाचे असून ते मिळणं आवश्यक आहे. मात्र बँकेचे अधिकारी त्यासंदर्भात संवेदनशीलतेने पाहत नसल्याचा आरोप आरती बोपचेने एबीपी माझा माझाशी बातचीत करताना केला आहे.
युनियन बँक ऑफ इंडियासमोर मनसेचे कार्यकर्त्यांचा जमाव, पोलीस बंदोबस्त तैनात
दरम्यान, एबीपी माझाने योगेश बोपचेच्या मृत्यूनंतर भाषेचा वाद निर्माण करून त्याच्या कुटुंबाची कशी अडचण केली जात आहे, याचं कटू वास्तव समोर आणलं. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सक्रिय झाली असून मनसेचे अनेक कार्यकर्ते युनियन बँक ऑफ इंडियाच्या सेमिनरी हिल्स शाखेसमोर गोळा झाले आहेत. कुठलीही अनुचित घटना होऊन तोडफोड होऊ नये म्हणून पोलिसांनीही या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त लावला आहे. बँकेला त्याचं आडमुठी धोरण मागे घ्यायला भाग पाडू, अशा भूमिकेत मनसे कार्यकर्ते बँकेसमोर गोळा झाले आहेत.
हे ही वाचा