Nagpur News : राज्याच्या सहकारी बँकिंग क्षेत्रात एका नव्या प्रयोगाची सुरुवात होत असल्याचे पुढे आले आहे. आर्थिक संकटातील बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सुदृढ बँकेची प्रशासक म्हणून पहिल्यांदाच नेमणूक करण्यात आली आहे. 'संस्थात्मक प्रशासक' या संकल्पनेतून सहकारी बँकिंग क्षेत्रात नव्या क्रांतीचा राज्य सरकारचा हा नवा प्रयत्न असल्याचे बोललं जात आहे. 

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य सरकारने प्रशासक म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या शिखर बँकेची नेमणूक केली असून उद्या गुढीपाडव्यापासून नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार राज्य सहकारी बँक आपल्या हाती घेणार आहे. 

आर्थिक दृष्ट्या डबघाईस आलेल्या एखाद्या बँकेवर सुदृढ बँकेला प्रशासक नेमण्याची म्हणजेच "संस्थात्मक प्रशासक" नेमण्याची ही राज्यातच नव्हे, तर देशातील सहकार क्षेत्रात पहिलीच घटना आहे. त्यामुळे राज्य सरकार या माध्यमातून सहकार क्षेत्रातील कमकुवत बँकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बँकांच्या माध्यमातून सुदृढ बनवण्याचा नवा प्रयोग करत आहे का? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. 

काय आहे या नवीन मॉडेल चे वैशिष्ट्ये 

-आर्थिक संकटात असलेल्या बँकेवर प्रशासक म्हणून आर्थिक दृष्ट्या सुदृढ बँकेला प्रशासक म्हणून नेमणे.

- "इन्स्टिट्यूशनल ऍडमिनिस्ट्रेशन" म्हणजेच "संस्थात्मक प्रशासक" ही संकल्पना सहकार क्षेत्रात महाराष्ट्रातच नाही तर देशात पहिल्यांदा वापरली जात आहे.

-यापूर्वी अशा स्थितीत व्यक्ती किंवा अधिकाऱ्याला प्रशासक म्हणून नेमले जायचे. मात्र त्यात अनेक मर्यादा असायच्या.

-मात्र आता संपूर्ण बँकेला प्रशासक म्हणून नेमल्याने त्या बँकेची संपूर्ण यंत्रणा, अनुभव आणि संसाधने आर्थिक संकटात असलेल्या बँकेला आर्थिक डबघाईच्या स्थितीतून बाहेर काढण्यामध्ये मोलाची ठरेल असा विश्वास.

- पूर्वी आर्थिक संकटात असलेल्या बँकेचे विलीनीकरण केले जायचे किंवा बँक अवसायनात काढली जायची. त्यामुळे निवडक बँकांचा साम्राज्य तयार व्हायचं.

पहिला प्रयोग यशस्वी झाला, तर राज्यातील सहकार क्षेत्रात नव्या आर्थिक क्रांतीची सुरुवात

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खातेदार आणि ठेवीदारांना अडचणीतून बाहेर काढण्याचा विश्वास प्रशासक म्हणून आलेल्या राज्य सहकारी बँकेने दिला आहे. सर्व ठेवीदार, खातेदार आणि शेतकऱ्यांनी संयम ठेवावे. हळूहळू बँकेचे व्यवहार सुरू करून लवकरच शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा ही सुरू करू, असा विश्वास शिखर बँकेचे अधिकाऱ्यांनी दिला आहे. बँकेवर बँकेलाच प्रशासक नेमण्याचा हा सहकारातील पहिला प्रयोग यशस्वी झाला, तर राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रात मोठे बदल घडतील आणि तर संपूर्ण सहकार क्षेत्रात नव्या आर्थिक क्रांतीची सुरुवात या नव्या मॉडेलमुळे होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी बोलताना माहिती देत विश्वास दर्शवला आहे.  

हे ही वाचा