Nagpur Bogus Teacher Scam : शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; नोकरीवर नसतांना शालार्थ आयडीच्या आधारे 540 शिक्षक अन् शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उचलला पगार
Bogus Teacher Scam : सायबर पोलीसांच्या तपासात 540 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडीवर संबंधित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी नोकरीवर नसतांना पगार उचलत असल्याचे धक्कदायक सत्य पुढे आले

Nagpur Bogus Teacher Scam : नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असताना या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. आयडी घोटाळ्यात अनेक अधिकाऱ्यांना अटक होत असल्याने आता अटकेच्या भीतीने दोन शिक्षणाधिकाऱ्यांसह अन्य तीन वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांनीही आधीच अटकपूर्व जामीन मिळवलाय. अटकपूर्व जामीन घेणाऱ्यांमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे, निलंबित वेतन अधीक्षक नीलेश वाघमारे, शिक्षण मंडळातील अधिकारी आणि माजी शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सह शिक्षण उपसंचालक दीपेंद्र लोंखेडे यांचा समावेश आहे.
प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता
राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा नागपूर सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे. यात आतापर्यंत काही अधिकारी आणि एका शिक्षकाला अटक करण्यात आली असून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ तयार करणाऱ्या शेकडो शिक्षकांवर कारवाई होणार आहे. २०१४च्या शिक्षक भरतीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाचा गैरफायदा घेत गणित, इंग्रजी आणि विज्ञान विषयाच्या शिक्षकांची गैरमार्गाने भरती करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या सर्व संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहेत. अशातच या प्रकरणाची व्याप्ती वाढत असताना कारवाईच्या भीती पोटी 2 शिक्षणाधिकाऱ्यांसह वरिष्ठांनी आधीच अटकपूर्व जामीन मिळवला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे पाय आणखी खोलात असल्याचे समोर आले आहे.
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी नोकरीवर नसतांना पगार उचलला
नागपूर सायबर पोलिसांनी 4 हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा डेटा चेक केला. त्यात सायबर पोलीसांच्या तपासात 540 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडीवर संबंधित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी नोकरीवर नसतांना पगार उचलत असल्याचे धक्कदायक सत्य पुढे आले. त्यामुळे सायबर पोलिस 540 आयडी नेम असलेल्या शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्याचा शोध घेण्यासाठी त्या नावाने नोटीस बजावली आहे . सोबतच यात संबंधित संस्था संचालकांना नोटीस बोलावून चौकशीला बोलण्यात येणार असल्याचे नागपूर सायबर सेल चे प्रमुख लोहित मतानी यांनी सांगितले. सध्या शिक्षक भरती घोटाळ्यात आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात अली असून पोलीस तपासात अनेक धक्क्यादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
अमरावती विभागातील शालार्थ आयडीची होणार चौकशी; मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल
बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकरीत घेऊन शासनाची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा घोटाळा नागपूर शिक्षण विभागात उघडकीस आला होता. त्यानंतर आता अमरावती विभागातही चौकशी होणार आहे. याबाबत एसआयटीमार्फत चौकशीची मागणी राज्यातील सत्ताधारी भाजपाच्या पदवीधर सेलचे अमरावती विभागातील प्रदेश सहसंयोजकांनीच केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाकडून पत्र प्रधान सचिवांकडे चौकशी व योग्य कार्यवाहीसाठी केले आहे. हे पत्र देखील हाती लागले आहे. त्यामुळे आता अमरावती विभागातील शालार्थ आयडीमध्ये नेमके काय झाले, हे समोर येणार आहे.
दरम्यान, अमरावती विभागातील सर्वच ठिकाणाच्या शालर्थ आयडीची चौकशीची मागणी पदवीधर सेलचे प्रदेश संयोजक मनीष गावंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या



















