Murud-Janjira Fort: मुरुड-जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची वाढती गर्दी आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गड पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या सुरक्षेचा पूर्णपणे विचारच केला जात नाही. समुद्रातून गडावर नेण्यासाठी बोटी सोडल्या जात आहेत. मात्र, या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा अनेक पट जास्त प्रवासी घेतले जात आहेत. आणखी गंभीर बाब म्हणजे या प्रवाशांना लाईफ जॅकेट घालण्याची कोणतीही सक्ती नाही. अनेक बोटींमध्ये तर लाईफ जॅकेटचा पत्ताच नाही. यापूर्वीही अशाच प्रकारे बोटी उलटण्याच्या घटना घडल्या असून काहींना जीव गमवावा लागला आहे. तरीही प्रशासन आणि बोट चालकांकडून कोणीही धडा घेतलेला दिसत नाही. पर्यटकांचा जीव धोक्यात घालून बेकायदेशीर पद्धतीने बोटी चालवल्या जात आहेत.

बोटीतून उतरवण्यासाठी पर्यटकांना अर्धा तास ते पाऊण तास प्रचंड उन्हात थांबवले जाते. लहान मुले, महिला, वयोवृद्ध यांना यामुळे त्रास सहन करावा लागतो. गडावर पोहोचल्यानंतरही सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही शासकीय कर्मचारी दिसत नाही. पिण्याचे पाणी, सावली, आपत्कालीन सुविधा यांचा तुटवडाही कायम आहे. सुट्ट्यांमध्ये अशी परिस्थिती वारंवार निर्माण होत असताना देखील प्रशासनाने कोणताही ठोस उपाययोजना केली नाही. नागरिकांच्या सुरक्षेचा खेळखंडोबा होत असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष धक्कादायक आहे. यामुळे नागरिकांत संताप वाढला असून, गडावर जाणाऱ्या प्रत्येक बोटीत लाईफ जॅकेट सक्तीचे करावे, क्षमतेनुसारच प्रवासी घ्यावेत आणि सुरक्षेच्या दृष्टीने शासकीय कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी आता होत आहे.