मुंबई : आपली व्यवस्था किती मुर्दाड बनली आहे याचं उदाहरण आज अख्ख्या महाराष्ट्रानं ‘याची देही याची डोळा’ पाहिलं. ज्या मंत्रालयामध्ये मंत्र्यांचा नेहमी राबता असतो, त्याच मंत्रालयाच्या सज्जावर उभं राहून एक तरुण शेतकरी मंत्र्यांना भेटण्याची याचना करतो आणि त्याच मंत्रालयातून मंत्र्यांना येण्यासाठी तब्बल पाऊण तास लागतो.


आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद जिल्ह्यातील ज्ञानेश्वर साळवे हा तरुण शेतकरी आपल्या व्यथा कृषीमंत्र्यांसमोर मांडण्यासाठी मंत्रालयात पोहोचला. पण त्याला मंत्र्यांची भेट न मिळाल्यानं त्यानं थेट मंत्रालयाच्या सज्जावर स्वारी केली आणि मंत्र्यांना भेटण्याची मागणी केली.

सोयाबीनला भाव द्या आणि स्वामिनाथन आयोग लागू करा, अशा दोन मागण्या ज्ञानेश्वर साळवे या तरुणाच्या आहेत

ज्ञानेश्वर साळवेच्या धमकीने मंत्रालयात खळबळ उडाली. पण हा प्रकार सुरु होऊन तब्बल 45 मिनिटं उलटल्यानंतर पहिले मंत्री रणजित पाटील घटनास्थळी पोहोचले. नंतर विनोद तावडे आले आणि अखेरीस दीपक केसरकर आले.

अखेर तब्बल दीड तासांच्या या नाट्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने या इसमाला सुरक्षित खाली उतरवण्यात आलं.

मंत्रालयात एखादी व्यक्ती जीवावर उदार होतो आणि त्याची बाजू ऐकून घेण्यासाठी मंत्र्यांना तब्बल 45 मिनिटे का लागतात, असा सवाल विचारला जातो आहे.

बातमीचा व्हिडीओ :