मुंबई : पगारवाढीसाठी तरुणाने दूरदर्शन टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. 'मीडिया बोलवा तरच खाली येईन नाहीतर जीव देईन', अशी धमकीही तरुणाने यावेळी दिली. मुंबईतील वरळी येथील दूरदर्शन कार्यालय परिसरात शुक्रवारी हा सगळा ड्रामा घडला.

Continues below advertisement

अजय पासवान असं आंदोलनकर्त्या तरुणाचं नाव आहे. चार तासांच्या ड्राम्यानंतर तरुणाला खाली उतरविण्यात पोलिसांना आणि अग्निशमन दलाला यश आलं.

अजय शुक्रवारी दूरदर्शन टॉवरवर चढला होता. टॉवरवर चढून त्याने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करत 'माझ्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मी जीव देईन', अशी धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच वरळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनाही पाचरण करण्यात आलं. अनेकदा समजावण्याच प्रयत्न करुनही अजय खाली उतरण्यास तयार नव्हता.

Continues below advertisement

'मी खासगी कंपनीत वाहन चालक आहे. मला पगारवाढ हवी आहे. माझे म्हणणे मीडियासमोर आले पाहिजे', असं अजय बोलत होता. अजयच्या मागणीवरुन अग्निशमन दलाने दूरदर्शन कार्यालयातून कॅमेरा आणि माईक मागवला. अजयचे म्हणणे शूट करत असल्याचं त्याला भासविण्यात आलं. अखेर मागण्याची ध्वनिफीत ऐकवल्यानंतर अजय खाली येण्यास तयार झाला.

अजय पासवान एका खासगी कंपनीत चालक म्हणून कार्यरत आहे. त्याचा पगार रखडला असून पगारवाढही होत नाही. म्हणून सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी त्याने हे कृत्य केले असल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली.