पेनाच्या आकाराचा हा हुक्का असल्याने सहजपणे कुणाच्या नजरेत न येता नशा करता येतो. त्यामुळे तुमचा मुलगा किंवा मुलगी एका विनाशकारी व्यसनाच्या विळख्यात अडकतो आहे का याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. पेन हुक्का हा ई-सिगरेटस् चा प्रकार म्हणून सर्रास खपवला जातोय. मात्र सलाम मुंबई फाऊंडेशनच्या सर्वेक्षणातून समोर आलेली ही आकडेवारी धक्कादायक आहे.
मुंबईत 5 तरुणांपैकी एक तरुण किंवा तरुणी पेन हुक्क्याच्या जाळ्यात अडकत आहे. पेन हुक्क्याचं व्यसन लागलेल्या तरुणाईचा वयोगट साधारणपणे 14 ते 25 वर्षे इतका आहे. इतकंच काय तर, दोन मुलांपैकी एक मुलगा पेन हुक्क्याच्या जाळ्यात अडकतो आहे, तर सात मुलींपैकी एक मुलगी पेन हुक्क्याच्या जाळ्यात अडकल्याचं धक्कादायक वास्तव सर्वेक्षणातून समोर आली आहे.
मुंबईतली 73% तरुणाई ही ई-सिगरेटद्वारा किंवा विविध गॅझेट्सद्वारा व्यसनाधिन होतात. सर्वेक्षण केलेल्यांपैकी 80% मुलांनी गंमत म्हणून ई-सिगरेट हातात घेतली आणि पुढे जाऊन ते खरी सिगरेट ओढायला लागले. तसंच व्यसनाधिन असणाऱ्या 56% तरुणांना ई-सिगरेटस्, पेन हुक्का हे गँझेटस् सुरक्षित वाटतात, असंही सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
या पेन हुक्क्याकडे तरुणाई ओढली जाते, याचं मुख्य कारण म्हणजे हा पेन हुक्का अगदी आई-वडिलांसमोर ओढला तरी त्यांना कळत नाही. पेन हुक्क्यातून धूर येत नाही. मुळात हातात लिहायचा पेन आहे, की ओढायचा पेन हुक्का हेच कळत नाही. शिवाय दिसायला आकर्षक, वेगवेगळ्या रंगात मिळणारा हा पेन हुक्का तरुणाईमध्ये स्टेटस सिम्बॉल ठरतोय.
केंद्र सरकारने हुक्का बंदीचा अध्यादेश काढला असला, तरी राज्य सरकार हुक्क्यावर कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे ऑनलाईन मार्केटमध्ये, पान टपरीवर आणि खुलेआम चालणाऱ्या हुक्क्याच्या दुकानांत हा पेन हुक्का सहज मिळतो.
ज्या वयात हातात पेन, पेन्सिल, पुस्तक असायला हवं त्या वयात तरुणाईच्या हातात गॅझेट्स आहेत. काळासोबत पेन, पेन्सिल, पुस्तकाऐवजी त्यांची जागा मोबाईल,लॅपटॉपनं घेतली खरी. पण, या गॅझेट्सच्या आडून जीवघेणी व्यसनं तरुणाईला विळखा घालत आहेत याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.