मुंबईत क्रिकेटरने अंधेरी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर कार घुसवली!
एबीपी माझा वेब टीम | 20 Feb 2017 10:22 AM (IST)
मुंबई : मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफॉर्मवर आज एका तरुणाने चक्क कार आणल्याने खळबळ उडाली. आज सकाळी सव्वासात वाजता हा प्रकार घडला. आरोपी तरुण हा क्रिकेटर असल्याचं कळतं. सकाळची वेळ असल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची ट्रेन पकडण्यासाठी लगबग होती. पण अंधेरी पश्चिमच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर तरुणाने चक्क कार आणल्याचं पाहून उपस्थित प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला. सुदैवाने चालकाने कारवर नियंत्रण मिळवल्याने कोणतीही अनूचित घटना घडली नाही. सध्या पोलिसांनी कारसह तरुणाला ताब्यात घेतलं आहे. हे ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रकरण आहे का या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत. सध्या त्याचं मेडिकल सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपी 25 वर्षीय तरुण क्रिकेटर असून त्याचं नाव हरमीत सिंह आहे. हरमीत सिंह रणजी खेळाडू आहे. हरमीत हा मूळचा मालडचा आहे. एअर इंडिया रेड, डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमी, भारत ब, भारत अंडर-19, मुंबई, राजस्थान रॉयल्स, शेष भारत, वेस्ट झोन या संघांकडूनही हरमीत सिंह खेळला आहे. "मी सकाळी सहा वाजता प्रॅक्टिससाठी जात होतो. पण रस्ता चुकलो आणि प्लॅटफॉर्मवर आलो," असा दावा हरमीत सिंहने केला आहे. मात्र प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हरमीत दारु पिऊन गाडी चालवत होता. त्याच्या कारमधून बीयरचं कॅनही जप्त करण्यात आल्याचं कळतं.