उल्हासनगर : बँकेच्या अनास्थेमुळे तरुणाचा उपचारांविना बळी गेल्याची संतापजनक घटना उल्हासनगरात घडली आहे. या प्रकरणी बँकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत तरुणाच्या वडिलांनी केली आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प-4 मधील ओटी सेक्शनमध्ये राहणारा गणेश कांबळे घरात एकटाच कमावता होता. तुटपुंज्या पगारात गणेशचं घर कसंबसं चालायचं. मात्र बँकेच्या चुकीमुळे आता या वयात तरुण कमावता मुलगा गमावण्याची वेळ गणेशच्या आई-वडिलांवर आली आहे.
गणेशला पोटाचा विकार झाल्यानं त्याच्यावर महिनाभर मुंबईच्या सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यासाठी सुरुवातीला गणेशच्या वडिलांनी पदरचे पैसे खर्च केले. मात्र हे पैसे संपले आणि त्यांनी गणेशच्या बँक खात्यात असलेले 28 हजार रुपये मिळावे, यासाठी त्याचं अकाऊंट असलेल्या उल्हासनगरच्या पंजाब नॅशनल बँकेत धाव घेतली. मात्र सुरुवातीला तब्बल 15 दिवस चकरा मारुनही अशाप्रकारे पैसे देताच येत नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं.
उपचारांसाठी पैसेच नसल्यानं नाईलाजास्तव पांडुरंग कांबळे यांनी मुलाला तशाच अवस्थेत घरी आणलं. एकीकडे गणेशला जागेवरुन उठताही येत नव्हतं आणि बँकेचे अधिकारी मात्र पैसे काढण्यासाठी गणेशलाच घेऊन येण्याचा हट्ट धरुन बसले होते. सरतेशेवटी 16 एप्रिल रोजी बँकेनं गणेश आजारी असल्याचं डॉक्टरांचं सर्टिफिकेट घेऊन येण्यास सांगितलं. त्यानुसार पांडुरंग कांबळे यांनी 17 एप्रिल रोजी सर्टिफिकेट बँकेत नेऊन जमा केलं, मात्र सरकारी काम आणि एक दिवस थांब म्हणत त्यांना उद्या आमचा माणूस खात्री करण्यासाठी तुमच्या घरी येईल, असं सांगण्यात आलं. मात्र दुर्दैवानं हा उद्याचा दिवस गणेश पाहूच शकला नाही. 18 एप्रिल रोजी पहाटे गणेशनं उपचारांअभावी जीव सोडला.
या सगळ्या प्रकारानंतर संतावलेल्या गणेशच्या मित्र आणि कुटुंबियांनी गणेशच्या मृतदेहासह बँकेत येऊन जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे धास्तावलेल्या बँकेनं तातडीनं त्याच्या खात्यातले सगळे पैसे देऊन टाकले. मात्र हेच शहाणपण जर वेळीच सुचलं असतं, तर कदाचित गणेशचा जीव वाचू शकला असता.
या सगळ्यानंतर आता बँकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी गणेशचे कुटुंबीय आणि मित्रांनी केली आहे. त्यासाठी विठ्ठलवाडी पोलिसांना लेखी तक्रारही देण्यात आली आहे.
या सगळ्याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांनी कॅमेरासमोर काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर विठ्ठलवाडी पोलिसांनी ही बँकेची अंतर्गत बाब असून त्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करायला हवी, असं मत व्यक्त केलं. शिवाय पोलिसांच्या वतीनं या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असं आश्वासन दिलं.
या सगळ्यानंतर पंजाब नॅशनल बँकेचे उच्चपदस्थ अधिकारी या प्रकाराची गांभीर्यानं दखल घेतील आणि गणेशच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देतील, हीच अपेक्षा.
पंजाब नॅशनल बँकेच्या अनास्थेमुळे उल्हासनगरात तरुणाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Apr 2018 04:45 PM (IST)
उल्हासनगरच्या कॅम्प-4 मधील ओटी सेक्शनमध्ये राहणारा गणेश कांबळे घरात एकटाच कमावता होता. तुटपुंज्या पगारात गणेशचं घर कसंबसं चालायचं. मात्र बँकेच्या चुकीमुळे आता या वयात तरुण कमावता मुलगा गमावण्याची वेळ गणेशच्या आई-वडिलांवर आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -