मुंबई : प्रसिद्ध पॉप सिंगर, गीतकार आणि संगीतकार म्हणून ओळख असलेल्या यो यो हनी सिंग उर्फ ​​ह्दयेश सिंग याच्या विरोधात पत्नी शालिनी तलवार यांनी तक्रार दाखल केलीय. वकिलांद्वारे शालिनी यांनी घरगुती हिंसा आणि इतर हिंसाचाराविरोधात दिल्लीतील तिस हजारी कोर्टात तक्रार दाखल केली आहे.


शालिनी सिंगच्या याचिकेवर दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने हनी सिंगच्या विरोधात नोटीस जारी करुन 28 ऑगस्टपर्यंत पत्नीने लावलेल्या सर्व आरोपांना उत्तर देण्यास बजावले आहे.


घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या या याचिकेत शालिनी सिंग यांनी पती हनी सिंगवर घरगुती हिंसा, लैंगिक हिंसा, मानसिक छळ आणि तिच्यासोबत आर्थिक फसवणुकीचा आरोप केला आहे. अशा स्थितीत न्यायालयाने दोघांच्या संयुक्त मालकीच्या मालमत्ता विकण्यासंदर्भात निर्देश जारी करताना हनी सिंगला अशा मालमत्तांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.


शालिनी तलवार यांच्या वतीने वकील संदीप कपूर, अधिवक्ता अपूर्व पांडे आणि जीजी कश्यप यांनी न्यायालयात युक्तिवाद सादर केला.


हिंदी पंजाबी गायक हनी सिंग 2011 मध्ये रिलीज झालेल्या 'कॉकटेल' चित्रपटातील 'इंग्लिश बीट' या गाण्याने देशभरात प्रसिद्ध झाला, त्यानंतर त्याने अनेक हिट गाणी गाऊन हिंदी श्रोत्यांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. 'आज ब्लू है पानी पानी' आणि शाहरुख खान-दीपिका पदुकोणवर चित्रीत केलेले 'चेन्नई एक्सप्रेस' मधील 'लुंगी डान्स' हे त्यांनी गायलेले गाणेही सुपरहिट ठरले.


38 वर्षीय हनी सिंगने 2011 मध्ये शालिनी तलवारशी लग्न केले आणि 2014 मध्ये एका रिअॅलिटी शोच्या माध्यमातून लोकांना त्याची पत्नीशी ओळख करून दिली.