Worli Hit And Run मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणात (Worli Hit And Run) मिहीर शाह (Mihir Shah) याला अटक करण्यात आली आहे. मिहीरची आई आणि बहीण यांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. आज माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मृत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली. वरळी कोळीवाड्यातील घरी जाऊन आदित्य ठाकरेंनी सदर अपघातामधील मृत महिलेच्या कुटुंबियांसोबत संवाद साधला. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 


माझ्याकडे शब्द नाही. त्यांना भेटल्यानंतर मन हेलावून जाते. अपघात होता असं सांगतात पण ही हत्याच आहे. कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्या मनातला राग दुःख आहे सर्व दिसते, एवढी भयानक गोष्ट मुंबई महाराष्ट्रात होऊ शकते, नरकातून राक्षस आला तरी असं करू शकणार नाही. त्यांना नुकसान भरपाई नको आहे. आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे, असं आदित्य ठाकरेंनी सांगितले.  


आदित्य ठाकरे काय काय म्हणाले?


आरोपी जर थांबला असता तर एक जीव वाचला असता, लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे. आरोपीला कोळी वाड्यात भर चौकात सोडा अशी मागणी आहे. राजेश शाह, मिहीर राजेश शाह हा राक्षसच आहे. सीसीटीव्ही पूर्ण आहे, इंटेलिजन्स आहे, मग आरोपीला अटक करण्यास 60 तास का लागले?, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. पुढची कारवाई कशी असणार? बुलडोझर चालवा, नाकाबंदी लावा...आधी राजेश शहाच्या घरावर बुलडोझर चालणार आहे का?, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली. 


मिहीर शाह तब्बल 60 तासांनतर गजाआड-


वरळीत घडलेल्या हिट अँड रनच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. हे अमानुष कृत्य करणारा मिहीर शाह तब्बल 60 तासांनतर गजाआड झाला आहे. मात्र, त्याने हे कृत्य कसं केलं त्याचा घटाक्रम मात्र तळपायाची आग मस्तकात जाईल असा आहे. महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वरळीमधील हिट अॅण्ड रनची घटना घडून 60 तास उलटल्यावर मिहीर शाहला तुरुंगात डांबण्यात आलं आहे. मिहीरची आई आणि बहिणीसह 12 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


वरळी हिट अँड रन प्रकरणाचा A टू Z घटनाक्रम


पहाटे साडेपाच वाजता अंधाऱ्या रस्तावरून प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा मासे घेऊन स्कूटरवरून चालले होते. मासे विकून चांगले पैसे मिळतील, अशी स्वप्न रंगवत असतानाच मागून अलिशान बीएमडब्ल्यू कारने त्यांना अशी धडक दिली की, प्रदीप नाखवा बोनेटवर कोसळले आणि कावेरी नाखवा चाकाखाली गेल्या. प्रदीप नाखवा यांनी विनवणी करूनही मिहीर शाह थांबला नाही. त्याने कावेरी नाखवा यांना चाकाखाली आलेल्या कावेरी यांनी फरफटत नेलं.  मृत कावेरी या अपघातात कारच्या बंपर आणि चाकामध्ये अडकल्या होत्या. सुमारे दोन किलोमीटर कावेरी यांना तसेच फरफटत आणल्यानंतर वरळी सीफेसला मिहिर शहा आणि शेजारी बसलेला राजऋषी बिडावत यांनी चाकात अडकलेल्या कावेरी यांना बाहेर काढले आणि तसेच रस्त्यावर टाकले. त्यानंतर आरोपींनी मोटरगाडी बाजूने न नेता कावेरी यांच्या अंगावरून नेली आणि तिथून पळ काढला.


संबंधित बातमी:


अपघातावेळी मिहीर शाह ड्रग्जच्या नशेत; ब्लड टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ नये म्हणून...; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ