मुंबई : रस्त्यावरील उघड्या मॅनहोलपासून लोकांना दूर ठेवण्यासाठी एक महिला जिवाची पर्वा न करता तब्बल 7 सात पाण्यात उभी राहिली. महिलेने दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


कांता मारुती कलन असे या महिलेचे नाव आहे. कलन या माटुंगा स्टेशनबाहेरील फूटपाथवरील झोपडीत अनेक वर्षांपासून राहत आहे. कांता या फुलांचा व्यवसाय करतात. मुंबईत 3 ऑगस्टला झालेल्या पावसात तुळसी पाईप रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. त्या पाण्यात कांता आणि त्यांच्या मुलींनी कशीबशी रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळीही परिस्थिती तीच होती. पाणी वाढतच होतं. महापालिकेकडून या रस्त्यावरील पाण्याचा निचरा व्हावा यासाठी काहीच हालचाल न झाल्याने शेवटी कांता यांनी मॅनहोलचे झाकण उघडले आणि पाण्याला वाट करून दिली. मात्र, मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याच्या बातम्या त्यांनी ऐकल्या होत्या. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी त्या सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत रस्त्यावर उभ्या राहिल्या. पाण्यात उभं राहून त्यांनी वाहनांना सुरक्षित वाट दाखवली.


पाण्यात तब्बल सात सात उभे राहिल्याने त्यांना ताप आला. मॅनहोलचे झाकण उघडल्याने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना खडसावले. "मॅनहोलचे झाकण तुम्हाला कोणी उघडायला लावले", असे त्यांनी विचारले. परंतु पाण्याची पातळी वाढत होती. त्यामुळे झाकण उघडण्याशिवाय कोणताही पर्याय माझ्याकडे नव्हता, असे त्यांनी सांगितले. तब्बल सात तास पाण्यात उभे राहिल्याने कांता यांची तब्येत बिघडली. त्यांना ताप आला.


रस्त्यावर उभे राहून वाहन चालकांना दिशा दाखवतानाच कांताचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल सध्या त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र त्या पाण्यात त्यांचा संसार वाहून गेला आहे. मुलींच्या शिक्षणासाठी ठेवलेले दहा हजार रुपये देखील पाण्यात वाहून गेले आहे. त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलींना पैसे नसल्याने या वर्षी शाळेत जाता येणार नाही. दोन मुलींच्या शिक्षणाचं काय होणार हा प्रश्न सध्या त्यांच्या समोर आहे.