मुंबई : राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (आस्थापना) हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली आहे. राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम बजावलेल्या हिमांशू रॉय यांनी गोळी झाडून आयुष्य संपवलं.
मुंबईतील राहत्या घरी दुपारी पावणेदोनच्या सुमारास त्यांनी तोंडात गोळी झाडून आयुष्याची अखेर केली. रॉय यांच्या आत्महत्येने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
आत्महत्येचं नेमकं कारण काय?
हॉर्स रायडिंग करताना ते पडले, त्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली. दुखापत बरी होत नसल्याने त्यांनी अधिक तपासण्या केल्या. त्यावेळी डॉक्टरांना संशय आला. त्यांनी कॅन्सरसंबंधित तपासणी केली असता, त्यांना बोन मॅरो कॅन्सर असल्याचं उघड झालं.
मुंबई तसंच परदेशात त्यांनी कॅन्सरचे उपचार केले. त्यांच्या अखेरचे उपचार पुण्यात सुरु होते. उपचारानंतर फिट झाल्याचं वाटल्याने त्यांनी पुन्हा जीम जॉईन केली. परंतु कॅन्सरने पुन्हा डोकं वर काढलं. त्यामुळे त्यांना नैराश्येने ग्रासलं. त्यामुळे आजारपणाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.
आयपीएस हिमांशू रॉय यांची आत्महत्या
कॅन्सरवर मात, नैराश्याने हरवलं
पिळदार शरीरयष्टी असलेल्या हिमांशू रॉय यांची प्रकृती कॅन्सरमुळे खालावली होती. अशा परिस्थितीती आपल्याला कोणी पाहू नये, असं त्यांना वाटत होतं. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली होती. कॅन्सरवर मात करुन पुन्हा वर्दीमध्ये ड्यूटी जॉईन करण्याची त्यांची इच्छा होती. परंतु याचदरम्यान, त्यांना नैराश्येने ग्रासलं. त्याच डिप्रेशनमधून त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.
अनेक जण हिमांशू रॉय यांच्याकडे फिटनेस टिप्स घेत असत. साखर खाणं बंद, तसंच गोड पदार्थ, गोडाचा चहा, साखर असलेली पेयं बंद केली, हे आपल्या फिटनेसचं रहस्य असल्याचं ते सगळ्यांना सांगत.
रॉय यांनी कोणालाही दुखावलं नाही : उज्ज्वल निकम
हिमांशू रॉय हा जिंदादिल माणूस होता. मोठ्या पदावर असून त्यांच्या वागण्याबोलण्यात कोणताही बडेजावपणा नव्हता. शिपायापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते अदबीने वागवायचे. कोणालाही ताटकळत ठेवत नसत. इतकंच नाही तर त्यांनी कधीही कोणाला दुखावलं नाही. त्यांना जिमची आवड होती. परंतु दुर्धर आजाराने त्यांना ग्रासलं. आजारामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे नैराश्य आल्याने त्यांनी आयुष्य संपवलं असावं, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.
कोण होते हिमांशू रॉय?
हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. चार वर्ष मुंबई क्राईम ब्रान्चमध्ये काम केलं होतं. तर एटीएएस प्रमुख म्हणून ते अधिक चर्चेत आले.
हिमांशू रॉय यांनी अनेक हायप्रोफाईल प्रकरणं हाताळली. यात जे डे हत्याप्रकरण, आयपीएल सट्टेबाजी प्रकरणांचा समावेश होता.
मात्र दोन वर्षांपूर्वी त्यांना दुर्धर आजाराने ग्रासलं. त्यामुळे ते मेडिकल लीव्हवर होते. आजारपणामुळेच त्यांनी आयुष्य संपवलं असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु शवविच्छेदन अहवालातूनच खरं कारण समोर येईल.
हिमांशू रॉय यांनी 2013 मधील आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अनेक अटकसत्र केलं होतं. त्यांनीच विंदू दारासिंहला बेड्या ठोकल्या होत्या.
याशिवाय अजमल कसाबच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणीही हिमांशू रॉय यांच्याच नेतृत्त्वात झाली होती.
हिमांशू रॉय घोड्यावरुन पडले तेव्हाच घात झाला!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 May 2018 03:39 PM (IST)
हिमांशू रॉय यांची आत्महत्या : मुंबईतील राहत्या घरी दुपारी पावणेदोनच्या सुमारास त्यांनी तोंडात गोळी झाडून आयुष्याची अखेर केली. रॉय यांच्या आत्महत्येने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -