नवी मुंबई :  लोकांकडून जादाचे भाडे वसूल करणाऱ्या आणि उध्दट उत्तरे देणाऱ्या रिक्षा चालकांवर काय करावाई केली याबाबत उत्तर द्या? अशी नोटीस लोकायुक्तांनी आरटीओ विभाग आणि मुंबई पोलीस आयुत्तांना बजावली आहे. गेल्या काही वर्षापासून मुंबई , उपनगर , नवी मुंबई , पनवेल भागात रिक्षा चालकांच्या मनमानीत वाढ झाली असून याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे लोकायुक्तांनी म्हटले आहे.


पनवेलमधील रहिवासी उल्हास वजरे यांनी पनवेल आणि नवी मुंबईतील रिक्षाचालक मीटरनुसार भाडे आकारत नसल्याच्या विरोधात तक्रार लोकायुक्तांकडे केली होती. यावर न्यायमूर्ती कानडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अनिल पाटील, उपायुक्त, आरटीओ, पनवेल यांचीही सुनावणी घेतली. परिसरातील रिक्षाचालक प्रवाशांकडून बेकायदेशीर पैसे घेतात आणि मीटर वापरत नाहीत, अशी वजरे यांची तक्रार होती.


पनवेल आरटीओकडून रिक्षा चालकांविरोधात मोहिम हाती घेण्यात आल्याचे निर्दशणास आणून देण्यात आले. पनवेल आरटीओने सांगितले की त्यांनी 2019 मध्ये रिक्षाचालकांविरुद्ध स्टिंग ऑपरेशन सुरू केले आणि त्या वर्षी 564 चालकांना दंड ठोठावला आणि 18.5 लाख रुपये वसूल केले. 2020 मध्ये, लॉकडाऊन असूनही, 202 रिक्षा चालकांवर कारवाई करून  8 लाख रुपये दंड तर  2021 मध्ये 125 रिक्षा, टॅक्सीवर कारवाई करून 6 लाखापर्यंत दंड जमा करण्यात आला आहे.


लोकायुक्तांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवला होता. अहवालात नमूद करण्यात आले आहे की ड्रायव्हर्सची एक "नियमित ब्लॅकलिस्ट" करण्यात येत आहे. त्याच बरोबर प्रवाशांच्या तक्रारींसाठी एक निवारण समिती देखील आहे. काही चालकांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे आणि प्रत्येक तक्रारीसाठी चालकांवर 1,100 रुपये दंड आकारला जातो.लोकायुक्तांनी पनवेल आरटीओने केलेल्या कारवाईवर समाधान व्यक्त केले.


न्यायमूर्ती कानडे म्हणाले की, ही बाब जनतेच्या हिताची आहे आणि तक्रार केवळ नवी मुंबई  आणि पनवेलमध्येच नाही, तर मुंबईच्या उपनगरातही असल्याने मुंबई पोलिसांनाही नोटीस बजावण्याची गरज आहे. पुढील सुनावणी १६ मार्च रोजी ठेवली आहे. नियमबाह्य रिक्षा चालकांविरोधात काय पावले उचलली याबाबत सविस्तर माहिती द्यावी अशी नोटीस आरटीओ विभाग आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवली आहे.