मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास आणखी आरामदायी होण्यासाठी पश्चिम रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर 12 अतिरिक्त एसी लोकल 19 फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येतील. तर, 3 नॉन एसी लोकल देखील सुरु करण्यात येणार आहेत. यामुळं लोकलनं प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यामुळं पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलची संख्या 1414 झाली आहे.
एसी लोकलची वाढती लोकप्रियता लक्षात घेत तथा सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशी पर्याय उपलब्ध असावेत यामुळं पश्चिम रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पश्चिम रेल्वाचा हा निर्णय आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळावा म्हणून करण्यात आला आहे. लोकल सेवांची वाढ गर्दी कमी करणं त्याचसोबत प्रवाशांना चांगला अनुभव मिळवून देण्यात फायदेशीर ठरेल, असं सांगण्यात आलं आहे.
पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार 12 एसी लोकल सुरु केल्या जाणार आहेत. ज्यापैकी 11 एसी लोकल सेवा सध्याच्या नॉन एसी लोकल सेवांच्या जागी चालवल्या जातील. तर, एक नवी एसी लोकल सुरु होईल. याशिवाय तीन अतिरिक्त नॉन एसी लोकल सेवा देखील सुरु केल्या जाणार आहेत.
पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलची संख्या 121 वरुन वाढून 133 झाली आहे. तर पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवांची संख्या 1410 वरुन 1414 झाली आहे.
विशेष बाब म्हणजेच शनिवार आणि रविवारी चालवल्या जाणाऱ्या एसी लोकलची संख्या देखील 77 वरुन वाढवून 106 करण्यात आली आहे.यामुळं सुट्टीच्या दिवशी प्रवास करणाऱ्यांना अधिक आरामदायी प्रवास करता येईल. याशिवाय सध्या सुरु असलेली वांदेर ते भाईदर लोकल सेवा आता विरार पासून सुरु होईल. यामुळं प्रवाशांना अतिरिक्त सुविधा आणि चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल.
एसी लोकल सेवांमधील वाढ मुंबईकरांची लाईफ लाईन म्हटल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेला अधिक सुरक्षित आणि प्रवासीकेंद्री सेवा सुरु करण्याबाबत पश्चिम रेल्वेची कटिबद्धता दाखवतं.
