मुंबई: राजधानी मुंबईची (Mumbai) जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या पश्चिम रेल्वेच्या (Railway) वांद्रे स्थानकात असलेली अस्वच्छता आणि कचरा विदेशी नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवली. त्यानंतर, एबीपी माझाने देखील या स्थानकात जाऊन सत्यता पडताळून पाहिली होती. त्यावेळी, कचऱ्यासाठी येथील अनधिकृत वस्ती जबाबदार असल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले होते. मात्र, एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टनंतर पश्चिम रेल्वेने आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे रुळांवर कचरा टाकण्यास मज्जाव व्हावा म्हणून कायमस्वरूपी लोखंडी कुंपण घालण्यात येत आहे. अनधिकृत घरांच्या बाजूलाच खड्डे करून त्यात लोखंडी खांब उभे केले जात आहेत. येत्या काही दिवसात हे कुंपण पूर्ण झाल्यावर लोकं ट्रॅकवर येणार नाहीत, कचरा देखील टाकणार नाहीत, असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात येत आहे.
वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकारवरील घाणीचे साम्राज्य एबीपी माझाने दाखवल्यानंतर रेल्वे प्रशासनाने कारवाई सुरू केल्याने एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट दिसून येत आहे. भारतीय संघाने विश्वचषक जिंकला, सर्वत्र आनंदही साजरा झाला. पण याच आयसीसी मेन्स टी-20 वर्ल्ड कपसाठी विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक मुंबईसह विविध शहरांत दाखल झाले होते. याच पर्यटकांनी वांद्रे रेल्वे स्थानकाच्या रुळांजवळ गरीब नगर इथे मोठ्या प्रमाणात उभारलेली झोपडपट्टी, प्लॅटफॉर्मवरील कचऱ्याचे ढीग आणि रुळांजवळ साचलेली घाण याची दृश्ये मोबाईलमध्ये चित्रित केली आहेत. ही रील्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्याने मुंबईच्या सार्वजनिक व्यवस्थेबाबत टीकेची लाट उसळली. जुनस रांटाला या परदेशी पर्यटकाने आपल्या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये वांद्रे स्थानकातील अस्वच्छता आणि अनधिकृत बांधकामे यावर प्रश्न विचारले आहेत. वांद्रे पूर्व येथील स्थानकाला लागून असलेली अनधिकृत झोपडपट्टी गेली अनेक वर्ष कारवाई न केल्याने झपाट्याने वाढत आहे. केवळ एक दोन नाही तर 6 मजली इमले इथे उभारले गेले आहेत. विदेशी पर्यटकांना हे दिसले ते रेल्वे अधिकारी, महानगरपालिका आणि राज्य सरकारला का दिसत नाही, असा प्रश्न एबीपीने विचारला होता. त्यानंतर, रेल्वे प्रशासनाने कारवाई सुरू केल्याचं दिसून आलं.
रेल्वे प्रशासनाकडून काम गतीमान
वांद्रे पश्चिमच्या गरिबनगर येथे रेल्वे प्रशासनाकडून कुंपण (Fencing) काम सुरू आहे. येथे पायाभरणीसाठी जवळपास 50 खड्डे तयार केले आहेत. त्यापैकी, 33 खड्ड्यांची पायाभरणी पूर्ण झालेली असून खांब उभारण्यात आलेल्या कुंपणाची लांबी 90 ते 150 मीटर एवढी आहे. पूर्ण झालेले कुंपण 37/150 रनिंग मीटर एवढे आहे. या एकूण कामाचा आवाका 150 रनिंग मीटर एवढा असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. सदर ठिकाणी कुंपण उभारणीचे काम प्रगतीपथावर असून उर्वरित काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचेही पश्चिम रेल्वेने सांगितले.
