#मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर, विरारकडे जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरु


 

मुंबई: लोअर परळजवळ एक्स्प्रेस गाडीचा डबा घसरल्यानं पश्चिम रेल्वेवरील चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.  या अपघातामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. एका मार्गावरील वाहतूक बंद असल्यानं प्रवाशांना सकाळीच मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

 

परेल वर्कशॉपमधून लोअर परेल यार्डात जात असताना रात्री 2 वाजून 5 मिनिटांनी हा अपघात झाला. हा डबा खाली असल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जवळ एक्सप्रेसचा डबा घसरल्यानं प्लॅटफॉर्म 1 आणि 2 वरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.

 

जलद मार्गावरील वाहतूक सध्या दादरपर्यंत सुरळीत सुरु आहे. धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आल्याने चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूकवरील देखील त्याचा परिणाम झाला आहे.  रेल्वे प्रशासनाकडून अपघातग्रस्त डबा हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.