मुंबई : सध्या ऐन दिवाळीत मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळालंय. कारण, ऐन दिवाळीच्या दिवसांत मुंबईतल्या अनेक भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होतोय. तर अनेक भागात पाणी टंचाईची स्थिती आहे. यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यानं मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव 100% भरलेत तरी, प्रशासनाच्या चुकांमुळे अनेक भागांत मुंबईकरांना ऐन दिवाळीत पाणीच नाही अशी स्थिती आहे. आगामी वर्षात निवडणुका आहेत. त्यामुळे प्रतिमा मलिन करण्यासाठी ऐन दिवाळीत कृत्रीम पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केलाय.


मुंबईत यंदाच्या दिवाळीत महापालिकेच्या स्थायी समितीतही फटाके फुटले. कारण होतं ऐन दिवाळीत नळाला पाणीच न येणं. मुंबईत ऐन दिवाळीतही पाणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यानं विरोधी पक्षनेत्यांसह इतर नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले आहेत.


गेल्या महिनाअखेरीस महापालिकेनं भांडुप संकुलातील झडपा बदलण्याचं काम प्रशासनानं हाती घेतलं होतं. त्यावेळीच दिवाळीआधीच हे काम संपेल याची खबरदारी घ्या असं महापौरांनी खडसावलंही होतं. पण, काम पूर्ण झालं तरी या कामाचे परिणाम मात्र ऐन दिवाळीत दिसलेच. कुर्ला, बोरिवली, सायन, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, कुलाबा भागांत ऐन दिवाळीच्या दिवसांत पाण्याच्या नावानं ठणठण गोपाळ झाला.


पाणी पुरवठा जाणूनबुजून बंद केल्याचा विरोधकांचा आरोप 
मात्र, हा पाणी पुरवठा जाणूनबुजून बंद केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. पुढील वर्षात महापालिका निवडणुका आहेत. त्यामुळे या दिवाळीत मतदारांना आकर्षीत करणं गरजेचं आहे. मात्र, ऐन दिवाळीतली ही पाणीबाणी प्रतिमा मलिन करेल अशी भीती नगरसेवकांना आहे.


गेल्या स्थायी समितीत पाण्यावरुन ऐनदिवाळीत रणकंदन झालं होतं. प्रशासनाला 3 दिवसांत सुधारणा आणि चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले गेलेत. बाकी, दिवाळीत पाणीटंचाई झाली तर त्याचे फटाके मतदारांकडून निवडणूकीत फुटल्याशिवाय राहणार नाहीत हे लोकप्रतिनीधी पुरेपूर जाणून आहेत. त्यामुळे सध्या सर्वसामान्य मुंबईकरांच्या प्रश्नासाठी दिसणारी ही तळमळ दरवेळी अशीच दिसू दे याच दिवाळीच्या सदिच्छा.