मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या म्हणजे 5 एप्रिलला देशातील प्रत्येक नागरिकांना घरात दिवे, मेणबत्ती, टॉर्च लावून उजेड करण्याचं आवाहन केलं आहे. जेणेकरून आपण सर्वजण एकत्र असल्याचा संदेश जाईल. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी, नागरिकांनी यावर आक्षेप घेत टीका केली. देशातील परिस्थिती काय आणि पंतप्रधान काय करतायेत असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. एबीपी माझाच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनीही त्यांचं वैयक्तिक मत आपल्या ट्विटर हँडलवर मांडलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर रश्मी पुराणिक यांनी उपहासात्मक टिप्पणी केली होती. भारतात लोकशाही असल्याने आपलं मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्याच अधिकाराचा रश्मी पुराणिक यांनी वापर केला. मात्र आपल्या नेत्याविषयी काहीही खपवून घ्यायचं नाही, अशीच मानसिकता काही भाजप कार्यकर्त्यांची आहे. मग काय रश्मी पुराणिक यांचं ट्वीट पाहून नाशिक जिल्ह्याचा भाजपचा सोशल मीडिया प्रमुख (ट्विटर हँडलवरील माहितीप्रमाणे) विजयराज जाधव याने खालच्या स्थरावर जाऊन अश्लिल भाषेत रश्मी पुराणिक यांच्या ट्वीटला रिट्वीट करत रिप्लाय दिला. त्यानंतर अनेकांनी वाहत्या गंगेत हात धुवत रश्मी पुराणिक यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
मात्र रश्मी पुराणिक यांनी संयमाने परिस्थिती हाताळत गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, नाशिक पोलीस, महाराष्ट्र पोलीस तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ट्विटरवर टॅग करत सर्व प्रकार त्यांच्या समोर मांडला. त्यानंतर रश्मी पुराणिक यांच्या ट्वीटची दखल घेतल नाशिक पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. नाशिक ग्रामीणमधील ओझर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. रश्मी पुराणिक यांनी जशासतसं उत्तर दिल्याने विजयराज जाधवची तंतरली आणि त्याने केलेले ट्वीट लगेच डिलीट केलं.
यादरम्यान अनेकजण रश्मी यांच्या बाजूने उभे राहिले, त्यांना धीर दिला. मात्र महिला सक्षमीकरण, बेटी बचाव बेटी पढाव असे नारे देणारे भाजपचे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात या गोष्टी का उतरवू शकत नाहीत. नक्की आपण कुठे कमी पडतोय याचा विचार वरिष्ठ नेत्यांनी करायला हवाय. भाजपचे महाराष्ट्राचे सोशल मीडिया आणि आयटी सेल हेड यांनी रश्मी यांच्या ट्वीटची दखल घेत ट्विटरवर म्हटलं की, "ताई आताच पोस्ट निदर्शनास आली. मात्र अशा प्रकारे महिलांविषयी अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तींचा आम्ही जाहीर निषेध करतो. यापुढे अशा कोणत्याही राजकीय पक्षांच्या महिलांविषयी अपशब्द खपवून घेतले जाणार नाहीत. तरी ताई काहीही मदतीस आपल्या सोबत आहे. तसेच ही व्यक्ती भाजपच्या कोणत्याही पदावर नाही आणि काहीही संबंध नाही.